भरधाव ॲक्टिव्हाची बुलेटला धडक; 21 वर्षीय तरुणाच्या पायाला फ्रॅक्चर, चालक फरार

भरधाव ॲक्टिव्हाची बुलेटला धडक; 21 वर्षीय तरुणाच्या पायाला फ्रॅक्चर, चालक फरार

निगडी | 4 सप्टेंबर 2026 : भरधाव आणि निष्काळजीपणे चालवण्यात आलेल्या लाल रंगाच्या मोपेडने समोरून बुलेट दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना यमुनानगर परिसरात घडली. या अपघातात 21 वर्षीय दुचाकीस्वाराच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेल्याचा आरोप आहे.

ही घटना 3 सप्टेंबर रोजी सकाळी 8:50 वाजण्याच्या सुमारास यमुनानगरमधील सद्गुरू गार्डनसमोर घडली. याप्रकरणी दादासाहेब रामचंद्र साळुंके - वय 53 यांनी फिर्याद दिली आहे. जखमी झालेला केतन दादासाहेब साळुंके - वय 21 हा त्यांचा मुलगा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन हा बुलेट 350 दुचाकी क्रमांक MH 14 LU 0775 वरून कामासाठी निघाला होता. सद्गुरू गार्डनसमोर आल्यानंतर समोरून लाल रंगाची होंडा  ॲक्टिव्हाआली.

अज्ञात चालकाने ॲक्टिव्हा भरधाव वेगात, निष्काळजीपणे आणि वाहतुकीच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवल्याचा आरोप आहे.  ॲक्टिव्हाने केतनच्या दुचाकीला समोरून डाव्या बाजूने जोरदार धडक दिली.

या धडकेत केतन खाली पडला. त्याच्या डाव्या पायाच्या पंजाला गंभीर मार लागून फ्रॅक्चर झाले. अपघातानंतर जखमी व्यक्तीला मदत न करता किंवा घटनेची माहिती पोलिसांना न देता चालक घटनास्थळावरून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 670/2026 नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories