पिंपरी | १ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ६१० कोटी ४४ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्या सहामाहीतील ही सर्वाधिक वसुली असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. शहरातील ७ लाख ६६ हजार नोंदणीकृत मालमत्ताधारकांपैकी ५ लाख ९ हजार २०० म्हणजेच ६६.४७ टक्के मालमत्ताधारकांनी कर भरला आहे.
गतवर्षी सप्टेंबरअखेर ४ लाख ७८ हजार २६८ मालमत्ताधारकांनी ६०३ कोटी रुपयांचा कर भरला होता. यंदा गतवर्षाच्या तुलनेत ६ कोटी ६२ लाख रुपयांची अधिक वसुली झाल्याची माहिती उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.
कर भरण्यासाठी ऑनलाइन माध्यमाला नागरिकांनी मोठी पसंती दिली आहे. ४ लाख ४५ हजार मालमत्ताधारकांनी ऑनलाइन पद्धतीने ४७१ कोटी ८३ लाख रुपयांचा कर जमा केला आहे. महिला बचत गटांमार्फत बिलांचे घरपोच वाटप, रिक्षांद्वारे जनजागृती, एसएमएसद्वारे कर व सवलतीची माहिती, थकबाकीदारांना नोटिसा आणि जप्ती मोहिमेसारखे उपक्रम राबविण्यात आल्याचे महापालिकेने सांगितले.
महापालिकेच्या १८ करसंकलन कार्यालयांमध्ये वाकडने सर्वाधिक ८४ कोटी ९१ लाख रुपयांची वसुली केली. त्यापाठोपाठ थेरगाव ५३ कोटी १५ लाख, पिंपरी नगर ४४ कोटी ९९ लाख, किवळे ४४ कोटी ९१ लाख, चिखली ४४ कोटी ६१ लाख आणि कस्पटे वस्ती कार्यालयाने ४५ कोटी १९ लाख रुपये वसूल केले. तळवडे कार्यालयाची वसुली सर्वात कमी ११ कोटी ९९ लाख रुपये आहे.
निवासी मालमत्ताधारक कर भरण्यात आघाडीवर असून ४ लाख ५१ हजार ७३९ निवासी मालमत्ताधारकांनी कर भरला आहे. बिगरनिवासी ४० हजार १९७, मिश्र १० हजार ४४, औद्योगिक ३ हजार ६६७ आणि मोकळ्या जमिनीच्या ३ हजार ४८९ मालमत्ताधारकांनी कर भरला.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी कर भरणाऱ्या नागरिकांचे आभार मानत यापुढे थकबाकीदार मालमत्तांकडून कर वसुलीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी १८ करसंकलन कार्यालयांचे उद्दिष्टनिहाय नियोजन आणि नियमित आढाव्यामुळे वसुली वाढल्याचे नमूद केले.