अविनाश-विश्वजीत यांच्या संगीत मैफिलीने अभिजात मराठी भाषा सप्ताहाची सांगता

अविनाश-विश्वजीत यांच्या संगीत मैफिलीने अभिजात मराठी भाषा सप्ताहाची सांगता

पिंपरी | १० ऑक्टोबर २०२६ : मराठी गीतांचा गोडवा, सुरांची मोहकता आणि भावनांच्या विविध छटांनी सजलेल्या अविनाश-विश्वजीत यांच्या संगीत मैफिलीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’ची सुरेल सांगता झाली. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या या कार्यक्रमात लोकप्रिय मराठी गीतांच्या सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली हे कार्यक्रम पार पडले.

अविनाश-विश्वजीत यांच्या संगीत मैफिलीची सुरुवात ‘मोगरा फुलला’ या गीताने झाली. त्यानंतर ‘का कळेना’, ‘कधी तू’, ‘भेटला विठ्ठल’ आणि ‘फूलवंती’ चित्रपटाच्या शीर्षकगीताने कार्यक्रमाला रंगत आणली.

‘केव्हा तरी पहाटे’ आणि ‘ओल्या सांजवेळी’ या भावस्पर्शी गीतांनी रसिकांना हळुवार भावविश्वात रमवले. तर ‘फॅन्टॅस्टिक’, ‘मदनमंजिरी’, ‘साथ दे / तुला पाहता’ आणि ‘आदी तूच अंती तूच’ या गीतांनी मैफिलीत उत्साह निर्माण केला.

मध्यंतरानंतर ‘आली ठुमकत नार छौ’, ‘अविनाश इन्स्ट्रुमेंटल’ आणि कुसुमाग्रजांच्या कवितेवर आधारित विश्वजीत यांच्या सादरीकरणाने रसिकांचे लक्ष वेधले. या कार्यक्रमातून मराठी साहित्य आणि संगीताचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

त्यानंतर ‘हृदयात वाजे समथिंग’, ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ आणि ‘असा हा धर्मवीर ट्रॅक’ या गीतांच्या सादरीकरणाने प्रेक्षागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात ‘हंबीर तू’ या गीताने मैफिलीची रंगत आणखी वाढवली. प्रेम, विरह, भक्तिभाव आणि मराठी संस्कृतीचे विविध पैलू उलगडणाऱ्या गीतांना उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.

अभिजात मराठी भाषा सप्ताहात नाटक, कविता, संगीत आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषेचा जागर करण्यात आला. अविनाश-विश्वजीत यांच्या संगीत मैफिलीने या सांस्कृतिक सप्ताहाची सांगता झाली.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories