परंदवडीत जुन्या वादातून दोन गटांत हाणामारी; परस्पर गुन्हे दाखल

परंदवडीत जुन्या वादातून दोन गटांत हाणामारी; परस्पर गुन्हे दाखल

परंदवडी | १७ ऑक्टोबर २०२६ : मावळ तालुक्यातील परंदवडी गावात जुन्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या जुन्या वादाचा उल्लेख करत एका गटाने मारहाणीची तक्रार दिली आहे, तर दुसऱ्या गटाने मागील पोलीस केस मागे घेण्यासाठी धमकावून मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास परंदवडी येथे घडली.

पहिल्या प्रकरणात चंद्रकांत रामभाऊ भोते (वय ५२, व्यवसाय शेती, रा. परंदवडी) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यांच्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांना ‘तू आमच्याविरुद्ध केलेली केस मागे घे, नाहीतर तुला बघून घेईन’, असे म्हणत धमकावले. फिर्यादीने केस मागे घेणार नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपींनी त्यांना हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे.

तसेच फिर्यादीचा मुलगा कुणाल रामभाऊ भोते याला लोखंडी रॉड आणि लाकडी काठीने हातावर व पाठीवर मारहाण करून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी दत्तात्रय महादेव पापळ (वय ५२), संतोष महादेव पापळ (वय ४९), राहुल संतोष पापळ (वय २२) आणि स्वराज यशवंत पापळ (वय २०) यांच्याविरोधात गुन्हा क्रमांक ३१३/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याच घटनेबाबत दुसऱ्या गटाकडून संतोष महादेव पापळ (वय ५०, व्यवसाय शेती) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यांच्या तक्रारीनुसार, चंद्रकांत रामभाऊ भोते (वय ५२) आणि कुणाल चंद्रकांत भोते (वय २५) यांनी त्यांच्या घराच्या अंगणात येऊन ‘तुम्ही मला मागच्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शनला उघड उघड पाडलं’, असे म्हणत वाद घातला.

फिर्यादीने या बोलण्यास विरोध केला असता दोघांनी त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच फिर्यादीचे वडील महादेव मारुती पापळ (वय ७७) यांनाही लाथा आणि हाताने मारहाण करून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी गुन्हा क्रमांक ३१४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही प्रकरणांत भारतीय न्याय संहितेतील मारहाण, शिवीगाळ, धमकी आणि सामूहिक कृत्याशी संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित आरोपींना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) नुसार नोटीस देण्यात आली आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories