पिंपळे सौदागर | १२ ऑक्टोबर २०२६ : पिंपळे सौदागर परिसरात चहाच्या टपरीजवळ एका तरुणावर लोखंडी कोयत्याने हल्ला करून त्याच्या दोन मित्रांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुणाच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली असून, आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देत परिसरात दहशत निर्माण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत राजाराम सूर्यवंशी (वय ३१, रा. नखाते कमान, शास्त्रीनगर, कुंजीर बिल्डिंग; मूळ रा. बोरूळ, ता. देवणी, जि. लातूर) यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी विजय रतन कोल्हे (रा. फ्लॅट क्रमांक १०१, खाणेकर बिल्डिंग, रामनगर लेन क्रमांक १, रहाटणी) आणि संतोष ऊर्फ दाद्या नरवटे (रा. बौद्धनगर, भाटनगर, पिंपरी) यांच्यासह सात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवरील रोज आयकॉन सोसायटीसमोर, एचडीएफसी बँकेशेजारी असलेल्या चहाच्या टपरीजवळ घडली.
फिर्यादीनुसार, यशवंत सूर्यवंशी हे त्यांचे मित्र विशाल आबा मोरे आणि अप्पाराव महादेव सूर्यवंशी यांच्यासह चहा पिण्यासाठी आले होते. त्यावेळी आरोपी लोखंडी कोयता आणि लाकडी दांडके घेऊन तेथे आले. त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून तिघांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे.
मारहाणीदरम्यान संतोष ऊर्फ दाद्या नरवटे याने हातातील लोखंडी कोयत्याने यशवंत यांच्या कपाळावर वार करून त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच आरोपींनी विजय कोल्हे याच्या नावाने धमकावत, 'तू आमच्या विजय कोल्हे मामाच्या नादी लागतो का? थांब, तुला दाखवतो,' असे म्हटल्याचा आरोप आहे. कोणी विजय कोल्हे यांच्या नादी लागल्यास त्याला संपवून टाकू, अशा आशयाची धमकी देत आरोपींनी मोठमोठ्याने ओरडून परिसरात दहशत निर्माण केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६५७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), १८९(२), १८९(४), १९०, १९१(२), १९१(३), ३५२ आणि ३५१(२) तसेच भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्टच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणातील संतोष ऊर्फ दाद्या नरवटे याला अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींबाबत पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.