तळेगाव दाभाडे | १७ ऑक्टोबर २०२६ : तळेगाव दाभाडे येथील कडोळकर कॉलनी परिसरात दोन महिलांमध्ये झालेल्या वादातून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पतीसोबतच्या संबंधाच्या कारणावरून झालेल्या वादात एका महिलेने घरात घुसून शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार केली आहे. तर दुसऱ्या महिलेने लोखंडी कोयत्याने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील कडोळकर कॉलनीमध्ये घडली.
पहिल्या तक्रारीनुसार, फिर्यादी महिला घरी असताना दुसरी महिला तिच्या घरात आली. तिने ‘हिच्या पतीसोबत का बोलतेस, त्यांना का भेटतेस?’ असे विचारत फिर्यादी आणि तिच्या मुलीला शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादीच्या डोक्याचे केस धरून तिला घराबाहेर ओढत आणले आणि हाताने व लाथांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४७९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम ३३३, ११५(२), ३५२ आणि ३५१(२) नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, याच घटनेबाबत दुसऱ्या महिलेनेही पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार, फिर्यादीच्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून फिर्यादी संबंधित महिलेला समजावण्यासाठी तिच्या घरी गेली होती.
त्यावेळी संबंधित महिलेने फिर्यादीला शिवीगाळ करून लोखंडी कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. फिर्यादीने हल्ला चुकवला; मात्र कोयत्याच्या पाठीमागील टोकाचा फटका तिच्या उजव्या डोळ्याच्या भुवईवर आणि पापणीच्या वरील भागावर बसून दुखापत झाली, असे तक्रारीत नमूद आहे. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या दुसऱ्या तक्रारीवरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४७८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम ११८(१), ३५२, ३५१(२) तसेच भारतीय हत्यार कायद्यातील कलम ४, २५ आणि २७ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दोन्ही गुन्ह्यांमध्ये महिला आरोपींना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) नुसार नोटीस देण्यात आली आहे.