पिंपरी, ता. १४ – नवीन वर्षातील पहिल्या मकरसंक्रांतीच्या दिवशी (ता. १४) रहाटणी परिसरात दोन सख्ख्या बहिणींचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला आहे. हा अपघात धनगरबाबा मंदिरासमोरील पेट्रोल पंपाजवळ दुपारी झाला. या अपघातामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दुपारी सव्वाच्या सुमारास या दोन बहिणी दुचाकीवरुन जात असताना हा अपघात घडला. ऋतुजा पांडुरंग शिंदे (वय २४) आणि नेहा पांडुरंग शिंदे (वय २०) अशी ही मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत. दोघी बहिणी दुचाकीवरुन (एमएच १४ केएम ९९६८) जात होत्या. त्याचवेळी मागून आलेल्या आयशर ट्रकने (एमएच ४० डीसी ०९६४) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका तीव्र होता की दोघींनाही गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलिस घटनास्थळी पोचले. ट्रकचालक जितेंद्र निराले (मूळ रहिवासी – मध्य प्रदेश) याला पोलिसांनी ट्रकसह ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती देताना काळेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट म्हणाले, ”चालकाला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
मृत बहिणी पुनावळे येथील रहिवासी होत्या. शिंदे कुटुंबाचा पुनावळे येथे मिरची कांडप व्यवसाय आहे. शिंदे दांपत्याला ऋतुजा व नेहा या दोनच मुली होत्या. ऋतुजाचे एलएलबीचे शिक्षण पूर्ण झाले होते तर नेहा महाविद्यालयीन शिक्षण घेत होती, असे राजेंद्र बहिरट यांनी सांगितले.