वाकड | 10 सप्टेंबर 2026 : वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी फॉर्च्युनर वाहनाची नंबर प्लेट लपविण्याची यांत्रिक व्यवस्था केल्याचा प्रकार समोर आला आहे. वाकड वाहतूक विभागाच्या पोलिसांनी केलेल्या तपासणीनंतर वाहनचालक तथा मालकाविरोधात फसवणूक आणि बनावट दस्तऐवजाशी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय भगवान दगडे (रा. ताथवडे, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या वाहनमालकाचे नाव आहे. रोहिदास धोंडू बोऱ्हाडे (वय 42), पोलीस हवालदार, वाकड वाहतूक विभाग यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दगडे यांच्या ताब्यातील टोयोटा फॉर्च्युनर क्रमांक MH 14 LN 4888 या वाहनाच्या पाठीमागील नंबर प्लेटवर स्वतंत्र यांत्रिक यंत्रणा बसवण्यात आली होती. या यंत्रणेच्या साहाय्याने वाहनाची नोंदणी प्लेट उघडता अथवा लपविता येत असल्याचे तपासात आढळल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
या यंत्रणेसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. वाहतूक शाखेकडून ई-चलान होऊ नये, वेगमापक कॅमेऱ्यांमध्ये वाहनाचा क्रमांक दिसू नये तसेच पोलीस नाकाबंदी किंवा अन्य कायदेशीर कारवाई टाळता यावी, या उद्देशाने यंत्रणा बसवण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
वाहनाचा क्रमांक जाणीवपूर्वक लपविल्यास अपघात किंवा अन्य गुन्हेगारी घटनेनंतर संबंधित वाहन आणि चालकापर्यंत पोहोचण्यात तपास यंत्रणांना अडथळा निर्माण होऊ शकतो. नंबर प्लेटमध्ये अनधिकृत बदल करून शासनाची फसवणूक केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी नोंदवला आहे.
हा प्रकार 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4:42 वाजण्यापूर्वी वाहनाचा वापर झालेल्या विविध ठिकाणी घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी 9 सप्टेंबर रोजी रात्री 11:29 वाजता वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 530/2026 नोंदवण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम 336(3), 318(4), 319(2) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 198 अंतर्गत पुढील तपास सुरू आहे.