चिंचवड | 10 सप्टेंबर 2026 : पोलिस अधिकारी असल्याचे भासवून डिजिटल अरेस्टची भीती दाखवत चिंचवडमधील एका कुटुंबाची 21 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी महिलेच्या वडिलांना त्यांच्या नावाचा दहशतवाद्यांना निधी पुरवण्यासाठी वापर झाल्याचे सांगत अटकेची धमकी दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी एका 56 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10:19 ते 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7:30 या कालावधीत चिंचवडमधील उद्योगनगर येथील क्वीन्स टाऊन सोसायटी मध्ये घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांशी संपर्क साधून आपण पोलीस असल्याचे सांगितले. त्यांच्या नावाचा वापर दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवण्यात झाल्याची खोटी माहिती देऊन आरोपींनी त्यांच्यावर मानसिक दबाव निर्माण केला.
या कथित प्रकरणात तातडीने अटक करण्यात येईल, अशी धमकी देत आरोपींनी डिजिटल अरेस्टची भीती दाखवली. तपासाच्या नावाखाली बँक खात्यातील रक्कम पडताळणीसाठी पाठवण्यास सांगण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीच्या वडिलांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये आरटीजीएसद्वारे एकूण 21 लाख रुपये पाठवले.
रक्कम पाठवल्यानंतर आरोपींकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने कुटुंबाने पोलिसांशी संपर्क साधला. ज्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा झाली, त्या खात्यांच्या धारकांचाही आरोपी म्हणून नोंदीत उल्लेख करण्यात आला आहे.
याप्रकरणी 9 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 476/2026 नोंदवण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 319(2) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66(C), 66(D) अंतर्गत तपास सुरू आहे.