राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात एटीएसला सर्वसाधारण विजेतेपद; नागपूर शहर उपविजेता, सदानंद दातेंच्या हस्ते गौरव

राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात एटीएसला सर्वसाधारण विजेतेपद; नागपूर शहर उपविजेता, सदानंद दातेंच्या हस्ते गौरव

पुणे : महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने आयोजित 21व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सर्वोत्कृष्ट तथा सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. नागपूर शहर पोलीस संघ सर्वसाधारण उपविजेता ठरला. राज्य राखीव पोलीस बलाच्या गट क्रमांक 2 येथील परेड मैदानावर झालेल्या समारोप समारंभात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते विजेत्या संघांचा गौरव करण्यात आला.

समारंभाची सुरुवात बँड पथकाच्या मानवंदनेने झाली. अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. मेळाव्यात सहभागी झालेल्या 26 संघांनी शिस्तबद्ध संचलन करून मानवंदना दिली. यावेळी विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना फिरते चषक प्रदान करण्यात आले.

एटीएसने सर्वसाधारण विजेतेपदासह वैज्ञानिक पद्धतीने गुन्हे तपासासाठी साहाय्य आणि माहिती तंत्रज्ञान प्रावीण्य चषक पटकावला. गुन्हे अन्वेषण विभागाचा शताब्दी फिरता चषकही एटीएसला मिळाला. पोलीस छायाचित्रण चषक नागपूर शहराने, तर पोलीस व्हिडीओग्राफी चषक कोकण परिक्षेत्राने जिंकला.

श्वान स्पर्धेचा चषक नांदेड परिक्षेत्राला मिळाला. घातपातविरोधी तपासणी चषक आणि कै. अशोक कामटे फिरता चषक राज्य राखीव पोलीस बल परिक्षेत्राने पटकावला. कोल्हापूर परिक्षेत्रातील ‘आझाद’ या श्वानाला उत्कृष्ट श्वान चषक प्रदान करण्यात आला.

पोलीस कर्तव्य मेळावा हा केवळ स्पर्धा नसून शिस्त, कौशल्य, शारीरिक क्षमता, मानसिक तयारी आणि समन्वयाचे दर्शन घडविणारा उपक्रम असल्याचे सदानंद दाते यांनी सांगितले. स्पर्धकांची मेहनत, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि संघभावनेचे त्यांनी कौतुक केले. विजेतेपद न मिळालेल्या स्पर्धकांनी निराश न होता प्रत्येक प्रयत्नातून शिकून आपली क्षमता विकसित करावी, असे आवाहन त्यांनी केले.

स्पर्धेत सहभागी होण्यास सुरुवात केल्यानंतर अवघ्या काही वर्षांत विजेतेपद मिळविल्याबद्दल दाते यांनी एटीएसचे विशेष अभिनंदन केले. धैर्य, सजगता आणि जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहण्यालाही पोलिसांच्या कामात महत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले.

रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने आयोजित होणाऱ्या 70व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यासाठी अधिक सराव आणि तयारी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. महाराष्ट्र पोलीस दलाने आगामी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. व्यावसायिक कर्तव्य बजावताना जनतेप्रती असलेली जबाबदारी कायम लक्षात ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला सुनील रामानंद, दत्तात्रय पडसलगीकर, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, राजकुमार व्हटकर, नवल बजाज यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी आभार मानले. पोलीस निरीक्षक अर्चना कदम आणि पोलीस हवालदार सचिन देवडे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories