रात्रपाळीतील स्वच्छता मोहिमेतून महिला कामगारांना वगळा, महापौरांचे प्रशासनाला निर्देश

पिंपरी, ता. २४ - अलीकडेच पिंपरी-चिंचवडमध्ये रात्रभरही स्वच्छतेचे काम केले जात आहे. या कामाचा   महापौर रवी लांडगे यांनी सोमवारी (ता. २३) आढावा घेतला. यावेळी रात्रीच्या स्वच्छता कामात महिलांची शिफ्ट बंद करावी, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महापौरांच्या या निर्णयाबाबत महिला कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे. 

महापौरांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून रात्रीच्या स्वच्छता उपक्रमाचे फायदे जाणून घेतले व रात्रीची स्वच्छता मोहीम सुरु ठेवावी पण त्यामध्ये केवळ पुरुष कर्मचाऱ्यांचा सहभाग ठेवावा. महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे त्यामुळे रात्रपाळीत महिलांना सहभागी करुन घेऊ नये, असे महापौरांनी सांगितले. 

शहर स्वच्छ ठेवणे ही प्रशासनासोबत नागरिकांचीही जबाबदारी आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. त्याचबरोबर शहरातील स्वच्छतेचा रोडमॅप तयार करण्यात यावा. शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

महापालिकेच्या दिवंगत मधुकर पवळे सभागृहात आरोग्य विभागाची आढावा बैठक पार पडली. यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील कचरा संकलन, कचऱ्याचे विलगीकरण, त्याची वाहतूक, सार्वजनिक स्वच्छतागृहे, रस्ते साफसफाई, पाणी स्वच्छता यासह विविध आरोग्यविषयक योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे, अतुल पाटील, किशोर ननवरे, अजिंक्य येळे, राजाराम सरगर, निवेदिता घार्गे, अश्विनी गायकवाड, पूजा दूधनाळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह आरोग्य निरीक्षक व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी आरोग्य विभागाच्या संबंधित विविध विषयांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती देत येणाऱ्या अडचणी मांडल्या. मनुष्यबळ, वाढती लोकसंख्या आणि काही भागांतील अंमलबजावणीतील अडथळे यावर त्यांनी प्रकाश टाकला. या सर्व बाबींवर प्रभावी उपाययोजना करून शहरातील स्वच्छता व आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

‘माझी वसुंधरा’ पुरस्कार मिळाल्याबद्दल केले अभिनंदन..

पिंपरी-चिंचवड महापालिकेला ‘माझी वसुंधरा’ अभियानामध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे महापौरांनी अभिनंदन केले. हा पुरस्कार केवळ सन्मान नसून मोठी जबाबदारी असल्याचे सांगत पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि शाश्वत विकासाच्या दिशेने सातत्याने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance