घरच्या किचनमधून उद्योजकतेकडे वाटचाल; अमृत संस्थेतर्फे २१ व २२ जुलै रोजी 'अन्नपूर्णा क्लाउड किचन' प्रशिक्षण
घरच्या किचनमधून उद्योजकतेकडे वाटचाल; अमृत संस्थेतर्फे २१ व २२ जुलै रोजी 'अन्नपूर्णा क्लाउड किचन' प्रशिक्षण
पिंपरी, ता. १७ जुलै २०२६ - घरगुती स्वयंपाक कौशल्याला व्यवसायाचे स्वरूप देऊन महिलांसह युवक-युवतींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने अमृत संस्थेतर्फे (Academy of Maharashtra Research, Upliftment and Training)२१ व २२ जुलै २०२६ रोजी पुण्यात 'अमृत अन्नपूर्णा क्लाउड किचन ट्रेनिंग प्रोग्राम' आयोजित करण्यात आला आहे. पुणे जिल्हा माहिती कार्यालयाने ही माहिती दिली आहे.
ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवांचा वाढता वापर आणि घरगुती खाद्यपदार्थांना मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कमी गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या गृहिणी, युवक-युवती तसेच नवउद्योजकांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे.
दोन दिवसांच्या प्रशिक्षणात क्लाउड किचन व्यवसाय सुरू करण्यापासून ते यशस्वीपणे चालविण्यापर्यंतच्या विविध बाबींवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये एफएसएसएआय (FSSAI)नोंदणी व परवाना प्रक्रिया, Swiggy आणि Zomato वर व्यवसायाची नोंदणी, मेनू नियोजन, पॅकेजिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग, ग्राहक व्यवस्थापन आदी विषयांचा समावेश असून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सहभागींना प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार आहे.
महिलांच्या उद्योजकतेला चालना देणे, युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि घरगुती उद्योगांना प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे अमृत संस्थेने कळविले आहे. प्रशिक्षणाद्वारे व्यवसाय संकल्पनेपासून प्रत्यक्ष विक्रीपर्यंतचा प्रवास सुलभ करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
प्रशिक्षणासाठी प्रवेश मर्यादित असून 'प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर सहभागींची निवड करण्यात येणार आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश केसकर (मो. ९३५९४०३८९१) किंवा अमृत पुणे जिल्हा कार्यालय (मो. ९११२२२८७६७) येथे संपर्क साधावा. तसेच नोंदणीची सुविधा अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.