बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा कॉंग्रेसचा निर्णय
Apr 09 2026
81
बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा कॉंग्रेसचा निर्णय
पुणे, ता. ९ - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी बारामती विधानसभा मतदारसंघाची २३ एप्रिलला होणारी पोटनिवडणूक आता बिनविरोध होणार आहे. कॉंग्रेसने उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना माघार घेण्याचे आश्वासन दिले आहे.
निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात कॉंग्रेसने उमेदवार उभा केल्याने ही निवडणूक इतर निवडणुकांसारखी चढाओढीची होणार होती. बऱ्याच राजकीय घडामोडीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही ही निवडणूक कॉंग्रेसने बिनविरोध करावी असा सल्ला दिला होता. सुनेत्रा पवार यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दोन वेळा फोन केला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही सपकाळ यांची भेट घेत बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करुन निवडणुकीतून माघार घेण्याबाबत विनंती केली होती. देशाचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
कॉंग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ''बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी असा राज्यातील नेत्यांचा निर्णय झाला आहे. आमचा निर्णय हायकमांडना कळवणार असून आज दुपारपर्यंत यावर हायकमांड निर्णय घेतील.'' ही पोट निवडणूक २३ एप्रिलला होणार आहे व ४ मे रोजी निकाल जाहीर होईल.