बावधनमध्ये ७६ वर्षीय महिलेची १.६९ कोटींची सायबर फसवणूक

बावधनमध्ये ७६ वर्षीय महिलेची १.६९ कोटींची सायबर फसवणूक

बावधन | १३ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील बावधन परिसरात एका ७६ वर्षीय महिलेची तब्बल १ कोटी ६९ लाख १८ हजार रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टेलिकॉम विभाग आणि मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची बतावणी करून आरोपींनी महिलेला अटकेची भीती दाखवली. त्यानंतर बँक खात्यांची पडताळणी करण्याच्या नावाखाली मोठी रक्कम वेगवेगळ्या खात्यांवर वळवून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.३० ते ११ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत घडली. या प्रकरणी बावधनमधील पाटीलनगर परिसरात राहणाऱ्या ७६ वर्षीय सेवानिवृत्त महिलेने फिर्याद दिली आहे.

या गुन्ह्यात राम शर्मा, विजय खन्ना आणि फसवणुकीची रक्कम ज्या बँक खात्यांवर वळवण्यात आली त्या खात्यांचे धारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरुवातीला आरोपींनी महिलेला फोन करून आपण नवी दिल्लीतील टेलिकॉम विभागातून बोलत असल्याचे सांगितले. महिलेच्या नावाने असलेल्या सिमकार्डवरून आक्षेपार्ह मजकूर आणि अश्लील व्हिडिओ पाठवण्यात आल्याचे सांगत त्यांच्याविरोधात तक्रार असल्याची भीती निर्माण केली.

त्यानंतर दुसऱ्या आरोपीने व्हॉट्सअॅप कॉल करून आपण मुंबई गुन्हे शाखेतील अधिकारी असल्याची बतावणी केली. महिलेच्या बँक खात्यातून बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचे आणि त्यांचा सहभाग मनी लाँड्रिंग प्रकरणात असल्याचे सांगण्यात आले.

आरोपींनी महिलेला अटक होणार असल्याची भीती दाखवली. तसेच व्हॉट्सअॅपवर सुप्रीम कोर्टाचा शिक्का असलेले कथित अटक वॉरंट पाठवून दबाव आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेकडून आरोपींनी बँक खाते, मुदत ठेवी आणि इतर गुंतवणुकीची माहिती घेतली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाची भीती दाखवून बँक खात्यांवरील रकमेची पडताळणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

आरोपींनी व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या कथित अधिकृत कागदपत्रांवर विश्वास ठेवून महिलेने वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे हस्तांतरित केले. रक्कम पडताळणीनंतर परत करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, पैसे परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.

या प्रकारात एकूण १ कोटी ६९ लाख १८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories