प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापनासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा - महापौर रवी लांडगे
प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापनासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा - महापौर रवी लांडगे
बिसलेरी इंटरनॅशनल आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्तविद्यमाने शहरात 'बॉटल्स फॉर चेंज' उपक्रमाची सुरवात
पिंपरी, ता. १८ - ''पिंपरी-चिंचवड शहरात पर्यावरणपूरक सवयी रुजवण्यासाठी बॉटल्स फॉर चेंजसारखे नावीन्यपूर्ण उपक्रम अत्यंत महत्वाचे आहेत. नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी ते प्रभावी ठरतात. त्याचबरोबर प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवणे गरजेचे आहे.'', असे मत महापौर रवी लांडगे यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड शहरात प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि बिसलेरी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत बॉटल एक्सचेंज उपक्रमांतर्गत पुनर्वापरित प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या बसण्याच्या बाकड्यांचे आणि कचरा संकलन डब्यांचे आज महापौर लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
महापौर लांडगे म्हणाले, ''बिसलेरीसोबतची आमची भागीदारी ही कंपन्या आणि प्रशासकीय संस्था जेव्हा एकत्रितपणे काम करतात, तेव्हा त्या काय साध्य करू शकतात याचे उत्तम उदाहरण आहे. कंपनीच्या या उपक्रमांमुळे शहरातील मोठ्या प्रमाणातील कचरा लँडफिलमध्ये जाणार नाही, नागरिकांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूकता वाढेल आणि सर्क्युलर इकॉनॉमीसाठी मजबूत पाया तयार होईल.''
बिसलेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (पीसीएमसी) सहकार्याने आज पीसीएमसी कार्यालय परिसरात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकपासून बनवलेल्या बेंचचे आणि प्लास्टिक संकलन डब्यांचे अनावरण करण्यात आले. हा उपक्रम बिसलेरीच्या प्रमुख “बॉटल्स फॉर चेंज” कार्यक्रमाचा भाग असून, प्लास्टिक कचऱ्याचे संकलन आणि पुनर्वापर यावर कंपनीचा भर असल्याचे यातून दिसून येते. यावेळी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापालिका आयुक्त व आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप ठेंगल तसेच महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन (एसडब्ल्यूएम) विभाग आणि सीएसआर सेलमधील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. बिसलेरी तर्फे सस्टेनेबिलिटी आणि कॉर्पोरेट अफेअर्स विभागाचे संचालक श्री. के. गणेश उपस्थित होते.
श्री. के. गणेश, संचालक, सस्टेनेबिलिटी आणि कॉर्पोरेट अफेअर्स विभाग, बिसलेरी इंटरनॅशनल यांनी सांगितले की, कचरा जिथे तयार होतो तिथेच त्याचे योग्य वर्गीकरण करण्याबाबत जनजागृती, विविध जनजागरण मोहिमा आणि शैक्षणिक संस्थांशी केलेले सहकार्य यांच्या माध्यमातून बिसलेरी आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कचरा व्यवस्थापनासाठी एक यशस्वी आणि व्यावहारिक मार्ग दाखवला आहे. भारतात योग्य कचरा व्यवस्थापन ही अपवादात्मक गोष्ट न राहता ती एक सामान्य सवय व्हावी, यासाठी बिसलेरी विविध संस्थांसोबत भागीदारी करण्यास कटिबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी, पिंपरी-चिंचवडमधील 8 शैक्षणिक संस्थांना प्रमाणपत्रे देण्यात आली. या संस्थांनी वर्षभर त्यांच्या कॅम्पसमध्ये सातत्याने प्लास्टिक कचरा संकलन केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात “बॉटल्स फॉर चेंज” उपक्रमाच्या 2025–26 या वर्षातील परिणामांचे सादरीकरणही करण्यात आले. बिसलेरीने भारतभरातील महानगरपालिका, विविध संस्था आणि नागरिकांसोबत मिळून 30,309 मेट्रिक टन प्लास्टिक कचरा संकलित करून तो पुनर्वापरासाठी पाठवला आहे.
पीसीएमसी सोबतची ही भागीदारी बिसलेरीच्या महानगरपालिकांशी असलेल्या सहकार्याच्या सातत्यपूर्ण विस्ताराचे प्रतीक आहे. या माध्यमातून समुदायांना योग्य कचरा व्यवस्थापनाच्या सवयी अंगीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. हे सर्व उपक्रम कंपनीच्या “ग्रीनर प्रॉमिस” मोहिमेचा भाग आहेत, ज्यामध्ये प्लास्टिकचा पुनर्वापर वाढवणे, समुदाय आधारित पुनर्वापर पद्धतीला प्रोत्साहित करणे, जलसंधारणाला मदत करणे आणि शाश्वत कचरा व्यवस्थापन व्यवस्था उभारणे यांचा समावेश आहे.