चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या पुणे विद्यापीठाच्या वक्तव्याबाबत विद्यापीठाने आपली भूमिका स्पष्ट करावी, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीची मागणी
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या पुणे विद्यापीठाच्या वक्तव्याबाबत विद्यापीठाने आपली भूमिका स्पष्ट करावी, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीची मागणी
पुणे, ता. ८ - ''सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कोणते भरीव काम केले ? '', अशा शब्दांत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारी विद्यापीठांच्या कामगिरीबाबत शुक्रवारी (ता. ६) नाराजी व्यक्त केली. विद्यापीठातील सध्या कार्यरत असलेल्या आजी-माजी प्राध्यापक आणि संशोधकांवर हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे विद्यापीठाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी होतेय. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने यावर तात्काळ लेखी प्रकटन प्रसिद्ध करुन आपली भूमिका प्रसिद्ध करावी. अन्यथा मंत्री महोदयांनी आरोप खरा आहे हे मान्य करुन स्वतः कुलगुरु, प्र-कुलगुरु यांनी राजीनामा द्यावा.'', अशी मागणी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने केली आहे.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर शिक्षण क्षेत्रात विद्यापीठातील शैक्षणिक गुणवत्तेबाबत चर्चा होत आहेत. विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष राहुल ससाणे म्हणाले, "विद्यापीठाच्या स्थापनेपासून ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, बहुजन समाजातील लाखो विद्यार्थी विद्यापीठात शिकले. त्यांनी देशभरात व जगभरात विद्यापीठाचे नाव उज्ज्वल केले. विद्यापीठातील सध्या कार्यरत असलेल्या आजी-माजी प्राध्यापक आणि संशोधकांवर हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे विद्यापीठाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी होतेय. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने यावर तात्काळ लेखी प्रकटन प्रसिद्ध करुन आपली भूमिका प्रसिद्ध करावी. अन्यथा मंत्री महोदयांनी केलेला आरोप खरा आहे हे मान्य करुन स्वतः कुलगुरु, प्र-कुलगुरु यांनी राजीनामा द्यावा."
उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचा विद्यापीठाने खुलासा करावा, असे पुणे विद्यापीठाचे माजी अधिसभा धनंजय कुलकर्णी यांनी म्हटले आहे. कुलकर्णी म्हणाले, "मंत्र्यांचे हे वक्तव्य पुणे विद्यापीठाची अप्रतिष्ठा करणारे आणि येथील प्राध्यापक, संशोधक, आजी-माजी कुलगुरु, प्र-कुलगुरु यांच्या कार्यावर अविश्वास दाखवणारे आहे. पुणे विद्यापीठाला अनेक जेष्ठ प्राध्यापक, संशोधकांची परंपरा आहे. विद्यापीठातील प्राध्यापकांना त्याच्या संशोधन कार्याबद्दल अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि संशोधन सहाय्य निधी मिळाला आहे. विद्यापीठाच्या वार्षिक अहवालात त्याची नोंद आहे. हे दुर्लक्ष करता येणार नाही."