चिंचवड | १२ ऑक्टोबर २०२६ : चिंचवडमधील चैतन्य ग्राफिक्स येथे कामाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका २१ वर्षीय तरुणाला चौघांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. शिवीगाळ करत पट्ट्याने, चपलेने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याने तरुण जखमी झाला आहे. त्याच्या मित्रालाही मारहाण झाल्याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ११ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० ते १२ ऑक्टोबर रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या दरम्यान चिंचवडमधील चैतन्य ग्राफिक्स, गुरुद्वाराजवळ घडली.
या प्रकरणी यश अमोल वावळकर (वय २१ वर्षे) यांनी फिर्याद दिली असून मुकुंदराज विठ्ठलराव गव्हाणे (वय २९ वर्षे, राहणार बोडके कॉर्नर, गहुंजे गाव, पुणे), यशराज अशोक पाटोळे (वय २४ वर्षे), यश श्रीराम वेदपाठक (वय २२ वर्षे) आणि शशांक सतीश भोळे (वय २० वर्षे) अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादीनुसार, चैतन्य ग्राफिक्सचे मालक मुकुंदराज गव्हाणे आणि फिर्यादीसोबत काम करणारे अन्य तीन आरोपी यांनी यश वावळकर यांना बाहेरील पर्सनल काम का करतोस, अशी विचारणा केली.
याच कारणावरून आरोपींनी वाद घालत यश यांना शिवीगाळ केली. त्यानंतर पट्ट्याने, चपलेने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या मारहाणीत यश यांच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, कानाला आणि दोन्ही हातांना दुखापत झाली. तसेच फिर्यादीचा मित्र कृष्णा गायकवाड यालाही आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६२८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.