चिंचवड ज्येष्ठ नागरीक संघ आयोजित व्याख्यानमालेस उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी, ता. १२ - चिंचवड येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित वासंतिक व्याख्यानमालेत अध्यात्म, विज्ञान, सकारात्मक जीवनशैली आणि नामस्मरण या विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तीन दिवसीय व्याख्यानमालेस श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
व्याख्यानमालेचे पहिले पुष्प अणुशास्त्रज्ञ डॉ. विवेक येळगावकर यांनी 'अध्यात्म आणि विज्ञान' या विषयावर गुंफले. त्यांनी विज्ञान आणि अध्यात्म यांचा परस्परसंबंध स्पष्ट केला. दुसऱ्या दिवशी कवी, लेखक पितांबर लोहार यांनी 'जीवन सुंदर आहे' या विषयावर मार्गदर्शन केले. सकारात्मक विचार, वाचनाची सवय आणि निरीक्षणशक्ती यामुळे जीवन समृद्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. हभप. स्मिता मराठे यांच्या 'नाम महिमा' या विषयावरील व्याख्यानाने व्याख्यानमालेचा समारोप झाला. नामस्मरण हा कलियुगातील सर्वात सोपा मोक्षमार्ग असल्याचे सांगितले. त्यांनी रसाळ शैलीत नाममहात्म्य विशद केले. आवडीने आणि नित्याने केलेले नामस्मरण जीवन सार्थकी लावते, असे त्या म्हणाल्या.
अध्यक्ष रमेश इनामदार यांनी संघाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. श्यामकांत खटावकर आणि नंदकुमार मुरडे यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. व्याख्यानमालेत अध्यात्म, विज्ञान, सकारात्मक जीवनशैली नामस्मरण यांचे महत्त्व उपस्थितांना पटवून देण्यात आले. समाजात सकारात्मक विचार आणि निरोगी जीवनपद्धती रुजविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे वक्त्यांनी सांगितले. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिकांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.