क्राईम रिपोर्ट -     शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - १३ जुलै २०२६

क्राईम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - १३ जुलै २०२६

 क्राईम रिपोर्ट -  

 शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - १३ जुलै २०२६ 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ मेडिकल स्टोअरमधील 73 लाखांहून अधिक रकमेच्या अपहारप्रकरणी कर्मचाऱ्यावर गुन्हा


पिंपळे सौदागर येथील लोटस हॉस्पिटलमधील लोटस ड्रग स्टोअरमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याविरुद्ध सुमारे ₹73.21 लाखांच्या अपहार आणि फसवणुकीप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत डॉ. शिवदर्शन मोहनलाल अगरवाल (वय ५१, रा. निगडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी दिग्वीजयसिंग प्रविणसिंग राजपूत (रा. ताथवडे, पुणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(४), ३१८(४) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२६ या कालावधीत फिर्यादी यांच्या मेडिकल स्टोअरमध्ये पगारावर नोकरी करत होता. या काळात विश्वासाचा गैरफायदा घेत औषध विक्रीतून मिळालेली रुपये ५२,५४,५३२ रक्कम स्वतःच्या बँक खात्यात वळविली. तसेच मेडिकलमधील रोख विक्रीतील रुपये ३३,६०,७६५ रक्कम स्वतःकडे ठेवून एकूण रुपये ७३,२१,७९४ रुपयांचा अपहार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध सांगवी पोलिस ठाण्यात १२ जुलै २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ पिंपळे गुरवमध्ये किरकोळ वादातून हाणामारी; लाकडी दांडक्याच्या मारहाणीत युवकाचा खांदा फ्रॅक्चर


पिंपळे गुरव येथील प्रभातनगर परिसरात पावसाचे पाणी अंगावर उडाल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत एका युवकाच्या खांद्याचे हाड फ्रॅक्चर झाले असून महिलांनाही मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत भुषण उत्तम सुरवसे (वय ३२, रा. प्रभातनगर, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ८ जुलै रोजी रात्री सुमारे ११ वाजता प्रभातनगर, गल्ली क्रमांक ३ येथे फिर्यादी व त्यांचे मित्र दीपक दिगंबर चव्हाण आणि किरण प्रभाकर गायकवाड हे रस्त्यावर उभे असताना आरोपी योगेश शिंदे व त्याच्यासोबत असलेला सूरज शिंदे हे महिंद्रा थार वाहनातून आले. वाहनामुळे पावसाचे पाणी अंगावर उडाल्याबाबत जाब विचारल्याचा राग मनात धरून आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप आहे.

त्यानंतर आरोपी सागर ऊर्फ गुड्डी शिंदे, योगेश शिंदे, रोहन प्रकाश लोखंडे आणि हिरामण लोखंडे यांनी पुन्हा घटनास्थळी येऊन फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या किरण गायकवाड यांच्या पत्नी, आई आणि बहिणीलाही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या मारहाणीदरम्यान आरोपी सागर ऊर्फ गुड्डी शिंदे याने लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या डाव्या खांद्यावर वार केल्याने त्यांच्या खांद्याचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) तसेच संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सागर ऊर्फ गुड्डी शिंदे आणि योगेश शिंदे यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ चाकणमध्ये घरगुती गॅसचे बेकायदा रिफिलिंग, महिलेविरुद्ध गुन्हा

चाकणमधील मेदनकरवाडी येथे घरगुती एलपीजी सिलेंडरमधील गॅस लहान सिलेंडरमध्ये बेकायदा भरत असल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चाकण दक्षिण पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून गॅस सिलेंडरसह रिफिलिंगचे साहित्य जप्त केले आहे.

याप्रकरणी महिला पोलीस शिपाई स्पाली भाऊसाहेब जगताप (ब. नं. ४५८२, चाकण दक्षिण पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, १२ जुलै रोजी दुपारी सुमारे ३.४५ वाजता गणेशनगर कॉलनी क्रमांक १, बालाजीनगर, मेदनकरवाडी (ता. खेड) येथील सुधीन अपार्टमेंटलगत असलेल्या पत्र्याच्या टपरीमध्ये कारवाई करण्यात आली.

या कारवाईत सुरेखा तिंथराज गिरी (वय ३०, रा. मुटकेवाडी, चाकण) ही घरगुती वापराच्या मोठ्या एलपीजी सिलेंडरमधील गॅस लहान सिलेंडरमध्ये बेकायदा रिफिल करताना आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळावरून दोन भरलेले मोठे घरगुती सिलेंडर, पाच रिकामे मोठे सिलेंडर, पाच छोटे रिकामे सिलेंडर, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा तसेच गॅस रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारा पाईप, रेग्युलेटर व नोझल असा एकूण २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, ज्वलनशील पदार्थांच्या सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करून मानवी जीवितास धोका निर्माण केल्याबरोबरच घरगुती गॅसचा गैरवापर करून शासन व ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप आरोपी महिलेवर आहे.

याप्रकरणी चाकण दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५८०/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), २८७, २८८ तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५ आणि (पुरवठा व वितरण नियमन) आदेश, २००० मधील संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ काळेवाडीत दगडफेक व मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा, तिघे अटकेत


काळेवाडी परिसरात मोठ्याने गोंधळ घालण्यास विरोध केल्याच्या कारणावरून दगडफेक व मारहाणीची घटना घडली असून, या प्रकरणी चार जणांविरुद्ध काळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ११ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता पवनानगर लेन क्रमांक ४ येथील साहिल जनरल स्टोअर्ससमोरील मोकळ्या जागेत घडली. याप्रकरणी सोहेल तवाबअली शेख (वय १८) यांनी फिर्याद दिली असून, त्यावरून १२ जुलै रोजी सायंकाळी ६.२४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

गौरव इंगवले, रोहन विचारे, बाळा गेद आणि सुरज घोडके अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी गौरव इंगवले, रोहन विचारे आणि सुरज घोडके यांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादीनुसार, आरोपी मोकळ्या जागेत मोठ्याने गप्पा मारत गोंधळ घालत होते. त्यावेळी फिर्यादी व त्यांचे चुलते मुजिफ मेहंदी हसन शेख यांनी त्यांना शांत राहण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपी गौरव इंगवले याने मुजिफ शेख यांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. त्यानंतर भांडण सोडविण्यास गेलेल्या फिर्यादी सोहेल शेख यांना "तू मला ओळखतो का, मी गौरव इंगवले आहे. भांडणात पडलास तर तुला सोडणार नाही," अशी धमकी देत त्यांच्या डाव्या हाताच्या कोपरावर दगड मारून जखमी केल्याचा आरोप आहे. तसेच इतर आरोपींनीही फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ विशालनगर येथे बेकायदा दारू वाहतूक करणारा तरुण अटकेत; १० हजारांचा मुद्देमाल जप्त

 सांगवी पोलिसांनी विशालनगर येथील गणपती चौकाजवळ बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला अटक केली. ही कारवाई १२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निलटु कार्तिक रॉय (वय ३१, रा. शिवरत्न हॉटेल, काळेवाडी फाटा, वाकड, पुणे) हा अरविंद वाईन्स शॉप, विशालनगर येथून खरेदी केलेला प्रोव्हिबिशन माल विक्रीच्या उद्देशाने घेऊन जात होता. तो होंडा अॅक्टिव्हा दुचाकी (क्र. एमएच-१४/एचसी-१४८१) वरून दारूची वाहतूक करत असताना पोलिसांना मिळून आला.

या कारवाईत पोलिसांनी सुमारे १० हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिस हवालदार प्रमोद विठ्ठल गोडे (ब.नं. १५१२) यांनी फिर्याद दिली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ चिंचवडमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर कारवाई; ९ हजार ३७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

 लिंक रोड, चिंचवड येथे आर्किड इंटरनॅशनल स्कूलसमोर  अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या एका इसमावर चिंचवड पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई रविवारी (ता. १२) दुपारी सुमारे १ वाजून २० मिनिटांच्या सुमारास करण्यात आली.

या प्रकरणी कलीम गौस सय्यद (वय ४३, रा. चेतना हॉटेलच्या वर, भीमनगर, चिंचवड, पुणे) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ), (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा ९ हजार ३७५ रुपये किमतीचा प्रोव्हिबिशन (दारूबंदी कायद्यानुसार प्रतिबंधित) माल बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी घेऊन जात असताना आढळून आला. त्यासाठी वापरण्यात आलेली टीव्हीएस कंपनीची ग्रे रंगाची ज्युपिटर गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आरोपीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम ३५(३) अन्वये नोटिस बजावण्यात आली आहे. 

या प्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात रविवारी (ता. १२) गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्याद पोलिस हवालदार धर्मनाथ किसन तोडकर (वय ४५, नेमणूक चिंचवड पोलीस ठाणे, पिंपरी-चिंचवड) यांनी दिली.

--------------------------------------------------------------------------------------------------

➡️ वल्लभनगर येथे अवैध देशी दारू विक्रीप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

संत तुकारामनगर पोलिसांनी वल्लभनगर परिसरात कारवाई करत अवैध देशी दारू विक्रीप्रकरणी एका महिलेवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई दि. १२ जुलै २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एफ-१ जिमसमोर, रोडच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर, वल्लभनगर, संत तुकारामनगर, पिंपरी येथे करण्यात आली.

या कारवाईत आरोपी सोनाली बितुरकंवर (वय ४१, रा. महात्मा फुलेनगर, एमआयडीसी भोसरी, पुणे) हिच्याकडे विक्रीच्या उद्देशाने ठेवलेल्या देशी दारूच्या ५० सिलबंद बाटल्या आढळून आल्या. या बाटल्यांची एकूण किंमत २ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी पोलिस शिपाई सुनील ज्ञानोबा धावारे (बक्कल क्रमांक ३११७), संत तुकारामनगर पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी महिलेला नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ चिंबळी येथे गावठी हातभट्टीची दारू विक्रीप्रकरणी एकास अटक

 चिंबळी (ता. खेड, जि. पुणे) येथे बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्याविरोधात दारुबंदी पथकाने कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी आणखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई शनिवारी (११ जुलै) रात्री ९.३५ वाजण्याच्या सुमारास स्टील मॉड्युलर कंपनीजवळील पत्र्याच्या शेडलगतच्या मोकळ्या जागेत करण्यात आली. या प्रकरणी गुन्हे शाखा दारुबंदी पथकाचे पोलिस शिपाई श्यामसुंदर वैजनाथ गुट्टे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी राजेश शंभू नट (वय ३२, रा. चिंबळी), बिजली उर्फ गौरी रविंद्र राजपूत (वय ३५, रा. राजे शिवाजी नगर, चिंबळी) आणि संतोष जैद (रा. पवना बँकेजवळ, चिंबळी फाटा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश  नट याला अटक केली आहे. 

पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ८० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू, अंदाजे ८ हजार रुपये किंमतीची, जप्त केली. आरोपी विनापरवाना आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या दारू विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२३, ३(५) तसेच महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories