क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - १४ जुलै २०२६
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
➡️ नवी सांगवीत किरकोळ धडकेच्या वादातून विद्यार्थ्यावर हल्ला
नवी सांगवी परिसरात रस्ता ओलांडत असलेल्या १७ वर्षीय विद्यार्थ्याला दुचाकीची किरकोळ धडक लागल्यानंतर झालेल्या वादातून दोघांनी त्याच्यावर मारहाण करून स्टीलच्या कड्याने वार केल्याची घटना रविवारी (ता. १२) रात्री घडली. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या अटकेची तजवीज करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन निशांत काळे (वय १७, रा. विद्यानगर, नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शनिवारी रात्री सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास माहेश्वरी चौक ते एम. एस. काटे चौक मार्गावरील सुरुची हॉटेलसमोरील सार्वजनिक रस्त्यावर ते रस्ता ओलांडत असताना रॉयल एनफिल्ड (एमएच-१२-एक्सव्ही-४२४६) या दुचाकीवरील चालक सिद्धार्थ कांबळे व मागे बसलेला आयुष तुळजाराम वाल्मिकी यांनी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे वाहन चालवत फिर्यादीच्या हाताला धडक दिली.
धडकेचा जाब विचारल्यानंतर दोघांनी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आयुष वाल्मिकी याने हातातील स्टीलच्या कड्याने फिर्यादीच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर व डाव्या गालावर वार केल्याने ते जखमी झाले. या हल्ल्यात फिर्यादीचा चष्माही फुटल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध सोमवारी (ता. १३) सांगवी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
➡️ जेवणाच्या बिलाच्या वादातून सुपरवायझरवर लोखंडी रॉडने हल्ला; दोघांना अटक
जेवणाच्या थकीत बिलाच्या वादातून एका सुपरवायझरवर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी हा अल्पवयीन गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना मावळ तालुक्यात रविवारी (ता. १२) घडली आहे.
या प्रकरणी राजकुमार ओमदत्त कोल (वय २९, व्यवसाय – सुपरवायझर, सध्या रा. आंबी, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. १२) रात्री सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास आंबी येथील आकांक्षा हॉटेल येथे ही घटना घडली. जेवणाच्या थकीत बिलाच्या कारणावरून आरोपी अक्षय कृष्णा शिवदनकर याने फिर्यादीला फोन करून हॉटेलमध्ये बोलावले. त्यानंतर त्याने हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या एस. के. नावाच्या कामगाराने तोच लोखंडी रॉड घेऊन फिर्यादीच्या उजव्या खांद्यावर मारहाण केली. तसेच तिसऱ्या आरोपीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी आरोपींवर सोमवारी (ता. १३) तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये तसेच तत्सम तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अक्षय कृष्णा शिवदनकर व दुसऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोवारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
➡️ सायबर गुन्ह्यात लोन एजंटविरुद्ध गुन्हा; देशभरातील १३ जणांची सुमारे २७.९४ लाखांची फसवणूक
संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला बँक खाते वापरण्यास दिल्याप्रकरणी एका लोन एजंटविरुद्ध पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गैरव्यवहार ४ जानेवारी २०२६ ते १४ जानेवारी २०२६ या कालावधीत चिंचवड येथील जिनियस इंटरप्रायजेसच्या कार्यालयातून घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. १३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार हेमंत साधू खरात यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रदीप अशोक राठोड (वय ३९, रा. विजयनगर, काळेवाडी, पुणे; मूळ रा. भोसरी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११२(२), ६१(२), ३१८(४), ३(५) तसेच फसवणुकीसंदर्भातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 'जिनियस इंटरप्रायजेस' या नावाने येस बँकेत खाते उघडून ते संघटित सायबर गुन्हेगारी टोळीच्या वतीने वापरण्यास दिल्याचा आरोप आहे. संबंधित खात्यावर ९३ लाख ६२ हजार २५७ रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे. या माध्यमातून देशभरातील १३ नागरिकांची एकूण २७ लाख ९३ हजार ८१९ रुपये ६ पैसे इतकी आर्थिक फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
➡️ थेरगावमध्ये ऑनलाइन मटका जुगारावर कारवाई; एकाला अटक, मोबाईल जप्त
गुन्हे शाखेच्या युनिट-२ पथकाने थेरगाव येथील बेरगाव गावठाण परिसरात ऑनलाइन मटका जुगारावर कारवाई करून एका आरोपीला अटक केली. या प्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमान मंदिरासमोरील तालीम परिसर, बेरगाव गावठाण, थेरगाव येथे सोमवारी (ता. १३) ही कारवाई करण्यात आली. आकाश हुसेन वाजंत्री (वय २९, रा. समता हौसिंग सोसायटी, थेरगाव) याला अटक करण्यात आली आहे. तर पिंटू सोनार (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) याला या गुन्ह्यात पाहिजे आरोपी करण्यात आले आहे.
आरोपी आकाश वाजंत्री हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ‘कल्याण’, ‘मिलन’, ‘राजधानी’ आणि ‘टाईम’ या नावाने चालणाऱ्या मटका जुगाराचे आकडे व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे इतरांकडून स्वीकारून ते पुढे पाहिजे आरोपीकडे पाठवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान त्याच्याकडून सुमारे १० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस हवालदार तुषार अशोक शेटे (गुन्हे शाखा, युनिट-२, पिंपरी-चिंचवड) यांनी फिर्याद दिली असून, काळेवाडी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक चव्हाण करीत आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
➡️ तडीपार आरोपीकडून कोयता जप्त, चिखलीत गुन्हा दाखल
तडीपार आदेशाचे उल्लंघन करून शहरात वावरत असताना तसेच बंदी आदेशाचा भंग करून कोयता बाळगणाऱ्या एका आरोपीविरुद्ध चिखली पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पोलिस शिपाई संतोष सुदाम भोर (वय ३१, नेमणूक चिखली पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बुद्धभूषण माणिक पालके (वय २८, रा. यशवंत कॉलनी, मोरेवस्ती, चिखली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. १२) रात्री ९.०५ वाजण्याच्या सुमारास स्पाईन रोडवरील जॉगर्स पार्क गार्डनजवळ आरोपी आढळून आला. त्याच्या ताब्यातील रिक्षामध्ये सुमारे ५०,१०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता ठेवलेला असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
आरोपीला पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-३) यांनी ४ एप्रिल २०२५ रोजीच्या आदेशान्वये १५ जून २०२५ ते १५ जून २०२७ या कालावधीसाठी पिंपरी-चिंचवड, पुणे शहर व पुणे ग्रामीण अशा संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. तसेच पोलीस आयुक्तांनी ८ जुलै ते २१ जुलै २०२६ या कालावधीत घातक शस्त्रे बाळगण्यास बंदी घालणारा आदेश लागू केला होता.
या दोन्ही आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध चिखली पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. १३) भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
➡️ बौध्दनगरात महिलेविरुद्ध अवैधरित्या दारू बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल
पिंपरी येथील बौध्दनगर परिसरात अवैध देशी-विदेशी दारू बाळगल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध पिंपरी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्रोहिबिशन अॅक्ट कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई १३ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास सोळा नंबर बिल्डिंगसमोरील मैदानातील पत्राशेडमध्ये, बौध्दनगर, पिंपरी येथे करण्यात आली. या प्रकरणी पोलिस शिपाई नंदलाल शिवाजी राऊत (पिंपरी पोलिस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी महिला शोभा मुरलीधर आंगरख (वय ५३, रा. सोळा नंबर बिल्डिंगजवळ, बौध्दनगर, पिंपरी) हिच्याकडे सुमारे २ हजार ४० रुपयांच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या.
पोलिस येत असल्याचे लक्षात येताच आरोपी महिला गल्लीबोळाचा फायदा घेऊन पसार झाली. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------