गहुंजेत 68 वर्षीय महिलेला गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न; सुनेसह 3 जणांविरोधात गुन्हा
गहुंजे : लोढा बेलमोंडो येथील घरात 68 वर्षीय महिलेला धक्काबुक्की करून छाती आणि गळा दाबत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आरोपींनी फिर्यादीच्या पती आणि मुलालाही मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
अनिता राजीव मेहतानी (वय 68, रा. लोढा बेलमोंडो, गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून प्रेरणा नारायण (वय 39), रूपकिशन नारायण (वय 72) आणि निर्मला नारायण (वय 65) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेरणा नारायण ही फिर्यादीची सून आहे. फिर्यादी या घरातील नोकराणीच्या बेडरूममध्ये गेल्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला. वादादरम्यान रूपकिशन नारायण याने फिर्यादीला जोराचा धक्का दिला. त्यानंतर दोन्ही हातांनी त्यांच्या छातीवर दाब देत अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
निर्मला नारायण हिने फिर्यादीचे दोन्ही हात पकडले, तर प्रेरणा नारायण हिने दोन्ही हातांनी फिर्यादीचा गळा दाबल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपीने हातातील एका वस्तूच्या साहाय्याने फिर्यादीच्या गळ्यावर जखम केली. “तुला जिवंत सोडणार नाही, तुझा खून करणार,” अशी धमकी देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या वादामध्ये फिर्यादीचे पती आणि मुलगा वैभव यांनी हस्तक्षेप केला. त्यावेळी आरोपींनी त्यांनाही हाताने मारहाण, धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनेतील कारण, उपलब्ध वैद्यकीय पुरावे आणि कुटुंबातील इतर सदस्यांचे जबाब तपासले जात आहेत.
याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 244/2026 नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार पुढील तपास सुरू आहे.