तरुणीचा गळा दाबून चाकूने वार; लॉजमध्ये नेऊन आक्षेपार्ह छायाचित्रे व्हायरल केल्याचा आरोप
पिंपरी : तरुणीला दुचाकीवरून आळंदी परिसरातील डोंगरावर नेऊन तिचा गळा दाबत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आरोपीने चाकूने तिचे केस कापून डाव्या गालावर वार केला. त्यानंतर तिला वाकडमधील लॉजवर नेऊन आक्षेपार्ह छायाचित्रे काढत ती व्हायरल केल्याचा आरोप आहे.
करीना मोहन माछरे (वय 24, व्यवसाय—घरकाम, रा. भाटनगर, पिंपरी, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून किशोर ऊर्फ कृष्णा अशोक पवार (वय 29, व्यवसाय—नोकरी, रा. साठेनगर, वडगाव रोड, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला तिच्या आईच्या घरातून दुचाकीवर बसवले. त्यानंतर तिला आळंदी परिसरातील डोंगरावर नेले. तेथे फिर्यादीच्या अंगावर धावून जात “आता मी तुला मारूनच टाकतो,” असे म्हणत तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
आरोपीने जवळील चाकू काढून फिर्यादीच्या डोक्यावरील केस कापले. फिर्यादी विनवणी करत असतानाही आरोपीने तिच्या डाव्या गालावर चाकूने वार करून जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याच प्रकरणात आरोपीने फिर्यादीला पुन्हा भाटनगर येथून जबरदस्तीने दुचाकीवर बसवून वाकडमधील भूमकर चौक परिसरातील एका लॉजवर नेल्याचा आरोप आहे. तेथे तिचे कपडे काढून छायाचित्रे घेतली. ही छायाचित्रे फिर्यादीच्या भावाला पाठवून इतरत्र प्रसारित केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 659/2026 नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित कलमांनुसार पुढील तपास सुरू आहे