फरासखाना पोलिसांचा बुधवार पेठेत छापा, चार बांगलादेशी महिलांची सुटका
पुणे, ता. ७ - फरासखाना पोलिसांनी बुधवार पेठेतील जनता बिल्डिंगमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर गुरुवारी (ता. ५) छापा टाकून चार बांगलादेशी महिलांची सुटका केली. आरोपींनी या बांगलादेशी महिलांना ब्युटी पार्लर किंवा शिवणकामाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून भारतात आणले. त्यानंतर त्यांना धमकावून आणि पैशांचे प्रलोभन दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले होते. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.
परिमंडळ - १ चे पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावळे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या पथकाने गुरुवारी (ता. ५) रात्री जनता बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर वेश्या व्यवसायावर छापा टाकला. यावेळी घरात चार बांगलादेशी महिला आढळून आल्या. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती.
आरोपींनी या बांगलादेशी महिलांना ब्युटी पार्लर किंवा शिवणकामाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून भारतात आणले. या महिलांना धमकावून व पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. त्यांच्या माध्यमातून आरोपीला पैसे मिळत होते.
या कारवाईत, बांगलादेशी एजंट मुल्ला, बाबू भैया उर्फ पापा शेख (रा. बुधवार पेठ), भोपसिंग राजपूत (रा. जनता बिल्डिंग, बुधवार पेठ) आणि इमारत मालक मीनाक्षी रमेश मेत्री (रा. बुधवार पेठ) या चौघांविरुध्द अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी भोपसिंग राजपूत याला अटक केली असून, इतर आरोपींचा सुरु आहे, असे माहिती पोलिस उपायुक्त रावळे यांनी सांगितले.