किवळेत तरुणाला हॉकी स्टिकने मारहाण; कोयत्याने धमकावल्याप्रकरणी 4 जणांना अटक

किवळेत तरुणाला हॉकी स्टिकने मारहाण; कोयत्याने धमकावल्याप्रकरणी 4 जणांना अटक

किवळे : के टाऊन इमारतीच्या परिसरात एका तरुणाला खाली बोलावून हॉकी स्टिकने मारहाण करण्यात आली. त्यानंतर कोयता घेऊन त्याच्याकडे धावून जात जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे.

पियुष अनिल चव्हाण (वय 24, रा. के टाऊन, किवळे, पुणे) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून इशान विक्रम डे (वय 26), सिद्धांत राजू लटांबळे (वय 27), शुभम गणेश प्रेमल (वय 29) आणि राहुल राघवराम चौहान (वय 28) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इशान डे याने फिर्यादीला फोन करून त्यांच्या इमारतीखाली आल्याचे सांगितले. मात्र, घरात पाहुणे असल्याने खाली येणे शक्य नसल्याचे फिर्यादीने स्पष्ट केले. त्यानंतर वेगळ्या मोबाइल क्रमांकावरून पुन्हा संपर्क साधून फिर्यादीला खाली बोलावण्यात आले.

फिर्यादी इमारतीखाली आल्यानंतर आरोपींनी त्यांच्याशी कोणतीही चर्चा न करता वाद घातला. “तुला खूप माज आला आहे,” असे म्हणत हॉकी स्टिकने पाठीवर आणि मानेवर मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर एका आरोपीने चारचाकी वाहनातून लोखंडी कोयता काढून फिर्यादीच्या दिशेने धाव घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

आरडाओरडा ऐकून फिर्यादीचे आई-वडील, आत्या आणि परिसरातील भाजी विक्रेते मध्यस्थीसाठी आले. आरोपींनी त्यांच्यासोबतही धक्काबुक्की करून फिर्यादीला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 279/2026 नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता, शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories