विद्युत डीपी तारचोरीचे 7 गुन्हे उघड; 4 आरोपींना अटक, 16.35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी-चिंचवड | 4 सप्टेंबर 2026 : आळंदी, मरकळ, भानोबाची कोयाळी आणि वडगाव घेनंद परिसरातील विद्युत डीपीमधून तांबे व ॲल्युमिनियमच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट 3 ने पर्दाफाश केला. या कारवाईत 4 आरोपींना अटक करण्यात आली असून, तारांसह गुन्ह्यांसाठी वापरलेली 3 वाहने असा एकूण 16 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासामध्ये आळंदी आणि दक्षिण चाकण पोलीस ठाण्यांतील एकूण 7 गुन्हे उघडकीस आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील विद्युत डीपीमधून तांबे आणि ॲल्युमिनियमच्या तारा चोरीला जाण्याच्या घटनांचा गुन्हे शाखा युनिट 3 कडून समांतर तपास सुरू होता. 3 सप्टेंबर रोजी पोलीस पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत संशयित भानोबाची कोयाळी परिसरात असल्याची माहिती मिळाली.
पथकाने परिसरात शोध घेऊन अक्षय बाबासाहेब काळे - वय 34 आणि राहुल दिनकर पोकळे - वय 20 या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी फरार आरोपी ललित मगर ऊर्फ नेपाळ्या याच्यासोबत विद्युत डीपीमधील तारा चोरल्याची माहिती दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
चोरी केलेल्या तांबे आणि ॲल्युमिनियमच्या तारा भंगार विक्रेते इजहार इस्माईल चौधरी - वय 40 आणि बृजमोहन असर्फीलाल प्रजापती - वय 30 यांना विकल्याची माहिती तपासात समोर आली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही भंगार विक्रेत्यांना ताब्यात घेतले.
आरोपींकडून चोरीला गेलेल्या 5 लाख 10 हजार रुपये किमतीच्या तांबे आणि ॲल्युमिनियमच्या तारा जप्त करण्यात आल्या. तसेच चोरीच्या घटनांमध्ये वापरलेली वेगवेगळी दुचाकी आणि चारचाकी अशी एकूण 3 वाहनेही जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या संपूर्ण मुद्देमालाची किंमत 16 लाख 35 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईमुळे आळंदी पोलीस ठाण्यातील 4 आणि दक्षिण चाकण पोलीस ठाण्यातील 3 असे एकूण 7 गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यांमधील चोरीला गेलेला 100 टक्के मुद्देमाल जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. फरार आरोपी ललित मगर ऊर्फ नेपाळ्या याचा शोध सुरू आहे.