पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेले पवना धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर महापालिकेच्या वतीने पारंपरिक पद्धतीने जलपूजन करण्यात आले. महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते जलपूजन करून जलदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी शहराला वर्षभर पुरेसा, नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी प्रार्थना करण्यात आली.
पवना धरण पूर्ण भरल्याने यंदा शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने समाधानकारक परिस्थिती निर्माण झाली आहे. जलपूजनाच्या निमित्ताने जलस्रोतांचे संवर्धन, पाण्याचा काटकसरीने वापर, नदीपात्राची स्वच्छता आणि जलपरिसराचे संरक्षण करण्याचा संकल्प करण्यात आला.
‘पाणी वाचवा, जलस्रोत जपा आणि भावी पिढ्यांसाठी जलसुरक्षित शहर घडवा’ असा संदेश यावेळी देण्यात आला. धरण परिसर आणि नदीपात्रात स्वच्छता राखावी, जलप्रदूषण टाळावे तसेच जलस्रोतांच्या संरक्षणासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यातील पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी जलस्रोतांचे नियोजनबद्ध संवर्धन, पाण्याची बचत आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
जलपूजन कार्यक्रमास उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता महेश बरीदे, जलसंपदा विभागाचे रजनीश भारिया, पत्रकार, महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.