चिंचवड | 3 सप्टेंबर 2026 : वाल्हेकरवाडी परिसरातील पवना नदीपात्राजवळ मोकळ्या जागेत सुरू असलेल्या तीन पत्ती जुगारावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 2 जणांना पकडण्यात आले असून, त्यांचे 4 साथीदार घटनास्थळावरून फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई 3 सप्टेंबर रोजी पहाटे 3:05 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट 1 मधील पोलीस कॉन्स्टेबल उद्धव बद्रीनाथ खेडकर यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवना नदीपात्राजवळील गुरांच्या गोठ्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत काही जण चार्जिंगच्या बल्बच्या प्रकाशात पैसे लावून तीन पत्ती जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे छापा टाकून सोनू अर्जुन सिंग - वय 30 आणि भानुदास भरत सुरवसे - वय 24 या दोघांना पकडण्यात आले. त्यांचे साथीदार लुकमान शेख, विरू सिंग, श्रवणकुमार आणि समीर लुकमान शेख हे घटनास्थळावरून फरार झाले.
आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पैसे लावून तीन पत्ती नावाचा जुगार खेळत आणि खेळवत असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, पत्त्यांची पाने, मोबाइल आणि दुचाकीसह एकूण 82 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 453/2026 नोंदवण्यात आला आहे. महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12(अ) अंतर्गत पुढील तपास सुरू असून, फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.