हिंजवडी | ९ ऑक्टोबर २०२६ : क्रेडिट कार्डबाबत माहिती विचारण्याच्या बहाण्याने एका २६ वर्षीय तरुणीची ९३ हजार १५९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार हिंजवडीत समोर आला आहे. अज्ञात महिलेने मोबाईलवर संपर्क साधून क्रेडिट कार्डबाबत माहिती विचारली आणि डिजिटल व्यवहाराद्वारे रक्कम वळविल्याची तक्रार करण्यात आली आहे.
या प्रकरणी एका २६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईलधारक महिलेविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३.०५ ते ३.२१ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. फिर्यादी हिंजवडी फेज क्रमांक २ येथील इन्फोसिस कंपनीत काम करत असताना अज्ञात महिलेने त्यांच्या मोबाईलवर फोन केला.
फोन करणाऱ्या महिलेने फिर्यादीच्या क्रेडिट कार्डबाबत माहिती विचारली. त्यानंतर CHEQ DIGITAL PRIVATE LI या नावाने डिजिटल व्यवहार करून फिर्यादीची एकूण ९३ हजार १५९ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९.५१ वाजता हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६(डी), ६६(सी) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
अज्ञात मोबाईलधारक महिलेचा शोध घेण्यासह संबंधित ऑनलाइन व्यवहारांचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.