हिंजवडी | १३ ऑक्टोबर २०२६ : मारुंजी येथील श्रीराम चौक परिसरात मारहाण केल्याच्या गैरसमजातून एका तरुणाला आणि त्याच्या मित्राला लोखंडी कड्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. आरोपींनी दोघांच्या डोक्यावर आणि उजव्या डोळ्याखाली वार करून गंभीर जखमी केल्याचा, तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात दोन महिलांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलदीप प्रकाश परबत (वय २७ वर्षे, राहणार मारुंजी, ता. मुळशी, जि. पुणे; मूळ राहणार परांडारोड, फुले प्लॉट, बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात चैतन्य धनंजय इवरे (वय २२ वर्षे, राहणार फलटण, जि. सातारा), २२ वर्षीय महिला (राहणार लक्ष्मी चौक, हिंजवडी) आणि २६ वर्षीय महिला (राहणार समृद्धी अपार्टमेंट, गोखलेनगर, पुणे) यांना आरोपी करण्यात आले असून अटक करण्यात आली आहे.
ही घटना १२ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मारुंजी येथील शुभम प्लेन्डोरा परिसरातील श्रीराम चौकात घडली.
फिर्यादी कुलदीप आणि त्यांचा मित्र हर्षद तेथे आले असता, आरोपी क्रमांक एक याला त्यांनी मारहाण केल्याचा गैरसमज आरोपींना झाला. या कारणावरून आरोपी क्रमांक एक ते तीन यांनी हातातील लोखंडी कड्याने कुलदीप आणि हर्षद यांच्या डोक्यावर व उजव्या डोळ्याखाली मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
तसेच, आरोपींनी हाताने मारहाण करून मुक्क्यांनी ठोसे दिले आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आहे.
या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८७९/२०२६ दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.