पिंपळे सौदागर | १३ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर परिसरात सीआयडी अधिकारी असल्याची बतावणी करून दोन अनोळखी व्यक्तींनी ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला लुटल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोन्याची रुद्राक्षाची माळ आणि हातातील सोन्याची अंगठी काढून घेत २ लाख ५५ हजार रुपयांचे दागिने चोरल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी नारायण ओंकार कासार (वय ७५ वर्षे, पिंपळे सौदागर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
ही घटना १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील कुंजीर चौकातील बेल्जियम वॅफल्स दुकानासमोर घडली.
फिर्यादी त्या ठिकाणी असताना दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. त्यांनी आपण सीआयडीचे अधिकारी असल्याचे सांगत फिर्यादीचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची रुद्राक्षाची माळ आणि हातातील सोन्याची अंगठी काढून कपड्यात ठेवण्यास सांगितले. या बहाण्याने आरोपींनी हातचलाखी करून दोन्ही दागिने चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये ६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, किंमत ५५ हजार रुपये, तसेच २० ग्रॅम सोन्याचे मणी असलेली रुद्राक्षाची माळ, किंमत २ लाख रुपये, यांचा समावेश आहे. चोरी झालेल्या दागिन्यांची एकूण किंमत २ लाख ५५ हजार रुपये आहे.
फिर्यादीने दिलेल्या वर्णनानुसार, दोन्ही संशयित पुरुषांचे वय अंदाजे ३० ते ४० वर्षांच्या दरम्यान असून त्यांनी पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि निळसर रंगाच्या पँट परिधान केल्या होत्या.
या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६६५/२०२६ दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.