मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ह्युंडाईच्या कार प्रकल्पाचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ह्युंडाईच्या कार प्रकल्पाचे उद्घाटन

पुणे | १४ ऑक्टोबर २०२६ : पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेडच्या (HMIL) अत्याधुनिक वाहन उत्पादन प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पात कंपनीकडून टप्प्याटप्प्याने ११ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यामुळे पुणे परिसरातील वाहन उद्योग, औद्योगिक विकास आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

उद्घाटन सोहळ्याला कोरिया प्रजासत्ताकाचे भारतातील राजदूत ली सेओंग-हो, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, ह्युंडाई मोटर ग्रुपचे एक्झिक्युटिव्ह चेअर युसन चंग, व्हाईस चेअर जेहून चांग, ह्युंडाई मोटर कंपनीचे प्रेसिडंट व सीईओ होजे मुनोज आणि ह्युंडाई मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ तरुण गर्ग उपस्थित होते.

तळेगाव प्रकल्पाची सध्याची वार्षिक उत्पादन क्षमता १ लाख ७० हजार वाहने असून, ती २०३० पर्यंत ३ लाख २० हजार वाहनांपर्यंत वाढविण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञान, स्वयंचलित गुणवत्ता तपासणी, डिजिटल उत्पादन व्यवस्था आणि आधुनिक प्रशिक्षण सुविधांचा समावेश आहे. तसेच येथे वार्षिक १ लाख ५० हजार इंजिनांची उत्पादन क्षमता असलेला स्वतंत्र इंजिन विभाग आहे.

विशेष म्हणजे, ह्युंडाई वेन्यू या नव्या मॉडेलचे उत्पादन केवळ पुणे प्रकल्पात केले जात असून, त्याची जागतिक बाजारपेठेत निर्यात करण्यात येत आहे. कंपनीने ३५ हून अधिक देशांमध्ये निर्यात वाढविण्याची योजना आखली आहे.

या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्युंडाईच्या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रातील आर्थिक विकास, रोजगारनिर्मिती आणि वाहन उद्योगाची परिसंस्था अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

कंपनीच्या माहितीनुसार, ५५ पुरवठादार भागीदारांनी महाराष्ट्रात सुमारे ४ हजार ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील पुरवठादारांच्या माध्यमातून राज्यात १८ हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

दरम्यान, भारतातील ३० वर्षांच्या प्रवासात ह्युंडाईने जवळपास १ कोटी वाहनांची देशांतर्गत विक्री आणि ४० लाख प्रवासी वाहनांच्या एकत्रित निर्यातीचा टप्पा गाठल्याचे कंपनीने जाहीर केले. तळेगाव प्रकल्पामुळे पुणे परिसराचे जागतिक वाहन उत्पादन क्षेत्रातील महत्त्व आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories