ग्रँड टूरच्या खर्चाची चौकशी करा; सचिन काळभोर यांची मागणी

ग्रँड टूरच्या खर्चाची चौकशी करा; सचिन काळभोर यांची मागणी

पिंपरी-चिंचवड | १५ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून ग्रँड टूर सायकल स्पर्धेसाठी प्रस्तावित ११३ कोटी रुपयांच्या खर्चावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या स्पर्धेच्या कंत्राट प्रक्रियेत कथित अनियमितता आणि आर्थिक हितसंबंध गुंतले असल्याच्या आरोपांची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, ग्रँड टूर सायकल स्पर्धेसाठी सुमारे ११३ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. या खर्चाचे स्वरूप, निविदा प्रक्रिया, कामांचे वाटप आणि सार्वजनिक निधीच्या वापराबाबत पारदर्शकता असणे आवश्यक असल्याचे काळभोर यांनी म्हटले आहे.

स्पर्धेशी संबंधित कंत्राटदारांकडून काही लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांना उपठेके देण्यात आल्याच्या आरोपांची निष्पक्ष पडताळणी करावी. तसेच, महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार आणि नगरसेवक यांच्यात कोणतेही नियमबाह्य आर्थिक हितसंबंध किंवा हितसंबंधांचा संघर्ष आहे का, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. हे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत.

दरम्यान, निगडी ते पिंपरीदरम्यान मुंबई-पुणे महामार्गावर मेट्रोच्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली असून खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित दुरुस्ती होत नसल्याने महापालिकेने अशा मूलभूत नागरी सुविधांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.

या प्रकरणात खर्चाचे अंदाजपत्रक, निविदा, कार्यादेश, करारनामे, उपकंत्राटे आणि देयके यांची उच्चस्तरीय समितीमार्फत तपासणी करण्यात यावी. चौकशीत अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच, निगडी ते पिंपरीदरम्यानच्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा आणि तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories