चिखलीत अवैध गॅस रिफिलिंगवर पोलिसांची कारवाई, २० वर्षीय युवकाविरोधात गुन्हा दाखल
Mar 07 2026
30
चिखलीत अवैध गॅस रिफिलिंगवर पोलिसांची कारवाई, २० वर्षीय युवकाविरोधात गुन्हा दाखल
पिंपरी, ता. ७ - हरगुडे वस्ती-चिखली येथे घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या लहान सिलेंडरमध्ये गॅस भरुन विक्री करण्याचा प्रकार शुक्रवारी (ता. ६) उघडकीस आला आहे. आरोपीविरोधात चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.४५ वाजण्याच्या सुमारास चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरगुडेवस्ती परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपी सत्यम भोसले (वय २० वर्षे, रा. चिखली) हा कोणताही परवाना नसताना घरगुती वापराच्या भरलेल्या गॅस सिलेंडरमधून रिफिलच्या सहाय्याने लहान सिलेंडरमध्ये गॅस भरत होता. अशा पद्धतीने गॅस भरताना सुरक्षेची कोणतीही खबरदारी न घेतल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण होण्याची शक्यता होती.
या ठिकाणी केलेल्या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून एक मोठा घरगुती गॅस सिलेंडर, आठ लहान सिलेंडर, गॅस रिफिलिंगचे साहित्य आणि इलेक्ट्रिक वजन काटा असा एकूण १६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता - २०२३ च्या कलम २८७ व २८८, जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ व ७ तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ च्या कलम ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.