वाकड | 3 सप्टेंबर 2026 : कॅफे पीटर कॅफेचे मालक असल्याचे सांगून चार कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास इक्विटी शेअर्स आणि चांगला आर्थिक परतावा देण्याचे आमिष दाखवत तीन गुंतवणूकदारांची तब्बल 11 कोटी 67 लाख 7 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. कंपनीतील आर्थिक व्यवहारांसाठी देण्यात आलेल्या स्वाक्षरी अधिकारांचा गैरवापर करून काही रक्कम स्वतःच्या बँक खात्यात वळवून अपहार केल्याचाही आरोप आहे.
याप्रकरणी दीपक दत्तात्रय बर्गे (वय 40, रा. फॉरेस्ट ट्रेल टाऊनशिप, भुगाव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सचिन चंद्रकांत साळुंखे (वय 37) आणि श्वेता सचिन साळुंखे (वय 35, दोघे रा. 24 के ओपुला, न्यू डीपी रोड, पिंपळे निलख, विशालनगर, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीसह संदीप मोहन कुलकर्णी आणि जॉयदीप डे यांचा विश्वास संपादन केला. आरोपींनी Glocal Foodworks Pvt. Ltd., Blackhat Syndicus Pvt. Ltd., Super Galaxy Sports Pvt. Ltd. आणि Otomax Tech Serve Pvt. Ltd. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला. गुंतवणूक केल्यास संबंधित कंपन्यांतील इक्विटी शेअर्स आणि चांगला परतावा मिळेल, असे आश्वासन दिल्याचा आरोप आहे.
या आश्वासनावर विश्वास ठेवून फिर्यादीने 10 कोटी 2 लाख 7 हजार रुपये, संदीप मोहन कुलकर्णी यांनी 40 लाख रुपये, तर जॉयदीप डे यांनी 1 कोटी 25 लाख रुपये गुंतवले. अशा प्रकारे एकूण 11 कोटी 67 लाख 7 हजार रुपये गुंतवण्यात आले.
मात्र, आरोपींनी स्वाक्षरी अधिकारांचा गैरवापर करून कंपनीतील काही रक्कम स्वतःच्या बँक खात्यात घेतली. तसेच गुंतवणुकीवरील परतावा आणि मूळ रक्कम परत न देता फसवणूक व अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 493/2026 नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 316(5), 318(4), 3(5) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमातील कलम 3 आणि 4 अंतर्गत पुढील तपास सुरू आहे.