पिंपरी-चिंचवड | १७ ऑक्टोबर २०२६ : जुनी सांगवी येथील संविधान चौकातील भारतीय संविधानाची प्रास्ताविका धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला कोणत्याही प्रशासकीय परवानगीशिवाय हटवून जमीनदोस्त करण्यात आल्याचा गंभीर आरोप पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने केला आहे. या प्रकरणातील संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी पोलीस आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
काँग्रेसने दिलेल्या निवेदनानुसार, जुनी सांगवीतील संविधान चौकात असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मोडतोड करण्यात आली. हा प्रकार संविधानाचा अवमान करणारा असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
या कामासाठी कोणतीही प्रशासकीय परवानगी देण्यात आली नसल्याचे महापालिकेच्या 'ह' क्षेत्रीय कार्यालयाने स्पष्ट केल्याचा उल्लेखही काँग्रेसच्या पत्रात करण्यात आला आहे.
या प्रकरणात स्थानिक भाजप नगरसेविका तथा 'ह' प्रभाग समितीच्या सभापती तृप्ती संतोष कांबळे यांच्या भूमिकेवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या सहभागातून हे कृत्य घडवून आणण्यात आल्याचा आरोप पत्रात करण्यात आला असून, संबंधितांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
भारतीय संविधान हे संपूर्ण देशाच्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्यामुळे संविधानाच्या प्रास्ताविकेची अशा प्रकारे मोडतोड करणे सहन केले जाणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे.
या प्रकरणातील सर्व संबंधितांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी. कारवाई करण्यास विलंब होत असल्यास त्याची कारणे प्रशासनाने जाहीर करावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
तसेच संविधान चौकाचे पूर्ववत पुनर्स्थापन करण्यात यावे, अशी मागणी नरेंद्र बनसोडे यांनी केली आहे.
पोलीस प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले नाहीत, तर काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, काँग्रेसने केलेल्या आरोपांबाबत संबंधित नगरसेविका किंवा पोलीस प्रशासनाची प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची ही काँग्रेसची मागणी असून, संबंधित कायदेशीर कलमे लागू होतात की नाही, हे तपासानंतर स्पष्ट होईल.