जुनी सांगवीतील संविधान चौकात विनापरवानगी काम; कारवाईची मागणी

जुनी सांगवीतील संविधान चौकात विनापरवानगी काम; कारवाईची मागणी

सांगवी | १७ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवडमधील जुनी सांगवी येथील संविधान चौकातील शिल्प हटविण्यावरून वाद निर्माण झाला आहे. चौकाच्या नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी आवश्यक परवानग्या न घेता काम करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, महापालिकेच्या 'ह' क्षेत्रीय कार्यालयाने पोलीस आयुक्तांकडे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रभाग क्रमांक ३२ मधील नगरसेविका तथा 'ह' प्रभाग समितीच्या सभापती तृप्ती कांबळे यांनी संविधान चौकाच्या नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी १० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली होती. मात्र, संबंधित कामासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या नव्हत्या. तसेच निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली नसल्याचे महापालिकेच्या पत्रात नमूद आहे.

विशेष म्हणजे, संविधान चौकातील कामासाठी महापालिकेने कोणतीही परवानगी दिलेली नाही, असे 'ह' क्षेत्रीय कार्यालयाने पोलीस आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

दरम्यान, चौकातील शिल्प हटविण्याच्या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत. निधी मंजूर नसताना आणि अधिकृत परवानगी मिळालेली नसताना शिल्प हटविण्याची घाई का करण्यात आली? तसेच हे काम विशिष्ट दिवशीच का करण्यात आले, असे सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणीही होत आहे.

महापालिकेने आपल्या पत्रात विनापरवानगी काम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली आहे. तसेच या प्रकरणामुळे परिसरात सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

आता संविधान चौकातील शिल्प हटविण्याच्या प्रकरणात पोलीस प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories