काळेवाडीत धारदार शस्त्रांचा धाक दाखवणाऱ्या दोन तरुणांना अटक

काळेवाडीत धारदार शस्त्रांचा धाक दाखवणाऱ्या दोन तरुणांना अटक

काळेवाडी | १७ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरात हातात धारदार शस्त्रे घेऊन रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना धाक दाखवत दहशत निर्माण केल्याप्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना काळेवाडीतील तांबे चौक ते नाणेकर चौक रस्त्यावर घडली असून, काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास रहाटणी परिसरातील काळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.

या प्रकरणी पोलीस अंमलदार गणेश भगवान जाधव यांनी फिर्याद दिली आहे. ते काळेवाडी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत.

या प्रकरणात शिवराज ज्ञानदेव चव्हाण (वय २०, रा. नवचैतन्य वस्ती, नथुराज कॉलनी, रहाटणी) आणि वैष्णव ऊर्फ रोहन सुनील जाधव (वय २१, रा. रहाटणी फाटा, दत्तनगर कॉलनी, रहाटणी) या दोघांना अटक करण्यात आले आहे.

फिर्यादीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दगड, शस्त्रे, अंडी, सोटे, तलवारी, भाले, लाठी, बंदुका किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू बाळगण्याबाबत मनाई आदेश लागू असताना आरोपींनी त्याचे उल्लंघन केले.

आरोपींनी हातामध्ये ५०० रुपये किमतीचा एक धारदार बाजूस आणि पुढील बाजूस बाकदार असलेले दोन लोखंडी कोयते घेऊन येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवल्याचा आरोप आहे.

तसेच सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६४३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ४(२५), क्रिमिनल लॉ अमेंडमेंटमधील कलम ३ आणि ७, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ३७(१)(३) आणि १३५ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास काळेवाडी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories