21 वा महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळावा; तीन स्पर्धांमध्ये नऊ पदकविजेते

21 वा महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळावा; तीन स्पर्धांमध्ये नऊ पदकविजेते

पुणे | ९ ऑक्टोबर २०२६ : 21 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यातील आयटी प्रोफिशियन्सी, घातपातविरोधी तपासणी आणि पोलीस फोटोग्राफी या तीन स्पर्धांचे निकाल जाहीर झाले आहेत. या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नऊ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके प्रदान करण्यात आली.

21वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा ५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झाला आहे. सर्व स्पर्धा निकोप आणि पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात, यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांतील अनुभवी व निष्णात पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपस्पर्धांचे पर्यवेक्षण वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत.

आयटी प्रोफिशियन्सी स्पर्धेत संगणकाच्या मूलभूत संकल्पना आणि नवीन तंत्रज्ञानाशी संबंधित वस्तुनिष्ठ चाचणी घेण्यात आली. यामध्ये पुणे बिनतारी संदेश विभागाचे सहाय्यक पोलीस फौजदार अमोल कोकरे यांनी सुवर्णपदक, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस हवालदार राजेश कंचे यांनी रौप्यपदक, तर मिरा-भाईंदर-वसई-विरार येथील सहाय्यक पोलीस फौजदार संदीप राणे यांनी कांस्यपदक पटकावले.

घातपातविरोधी तपासणी स्पर्धेतील ग्राउंड सर्च प्रकारात महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीचे पोलीस नाईक आशिष बाळकृष्ण पाटील यांनी सुवर्णपदक, त्याच प्रबोधिनीचे पोलीस नाईक सतीश बाळकृष्ण गायकवाड यांनी रौप्यपदक, तर गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस हवालदार पंकज हुळके यांनी कांस्यपदक मिळवले.

पोलीस फोटोग्राफी स्पर्धेत कोकण परिक्षेत्राचे पोलीस हवालदार ए. ए. गमरे यांनी सुवर्णपदक, दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस शिपाई तुलशीदास पहारे यांनी रौप्यपदक आणि ठाणे शहरचे पोलीस शिपाई सचिन सोपान चव्हाण यांनी कांस्यपदक पटकावले.

या तिन्ही स्पर्धांचे निकाल ७ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले. विजेत्यांचा सत्कार ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता राज्य राखीव बल गट क्रमांक २ येथे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय शिंदे, राज्य गुन्हे अभिलेख केंद्र, पुणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories