पिंपरी-चिंचवड | ९ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक १, चिखली परिसरातील पाच अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईत अंदाजे १२०० चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. फ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अतुल पाटील यांच्या अधिपत्याखाली अनधिकृत बांधकामांचे निष्कासन करण्यात आले.
चिखली परिसरातील संबंधित पाच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या पथकाने यंत्रसामग्रीसह मोहीम राबवली. यामध्ये दोन ट्रॅक्टर ब्रेकर आणि दोन जेसीबी यांचा वापर करण्यात आला.
या कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहा अतिक्रमण पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ५० जवान तैनात करण्यात आले होते. तसेच महापालिकेचे दोन मजूर आणि दहा कंत्राटी मजूर सहभागी झाले होते.
कारवाईवेळी उपअभियंता हेमंत घोड, बीट निरीक्षक साईनाथ देसाई, प्रफुल भोकरे, ऐश्वर्या मासाळ आणि सूरज माने यांच्यासह महापालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, चिखलीतील या कारवाईत एकूण पाच अनधिकृत बांधकामांचे निष्कासन करण्यात आले असून, अंदाजे १२०० चौरस मीटर बांधकाम क्षेत्रावर कारवाई झाली आहे.