मोरवाडी परिसरात बांधकामादरम्यान स्फोटकांचा वापर करणाऱ्या बिल्डरवर कारवाईची मागणी
'आरपीआय'चे पिंपरी विधानसभा अध्यक्ष दादा शिरोळे यांची मागणी
पिंपरी, ता. ४ - मोरवाडी-पिंपरी येथे म्हाडा कॉलनी परिसरात सुरु असलेल्या एका खाजगी इमारतीच्या बांधकामासाठी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा (ब्लास्टिंग) वापर केला जात आहे. त्यामुळे, परिसरातील स्थानिक रहिवासी, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' (आठवले गट) चे पिंपरी विधानसभा अध्यक्ष दादा शिरोळे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिकावर कारवाई न केल्यास स्थानिक नागरीकांकडून आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
शिरोळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोरवाडी येथील म्हाडा कॉलनीच्या अगदी शेजारी खिंवसरा अँड असोसिएटस् प्रमोटर्स अँड बिल्डर्स' यांच्या वतीने एका नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. त्याचा पाया खोदकामासाठी बिल्डरकडून दररोज सकाळी ६ वाजल्यापासूनच हाय-डेसिबल स्फोटकांचे स्फोट घडवून आणले जात आहेत. शासकीय नियमांनुसार रहिवासी परिसरात अशा प्रकारे पहाटेच्या वेळी तीव्र स्फोटके वापरण्यास सक्त मनाई असतानाही विकासकाकडून नियमांची सर्रास पायमल्ली केली जात असल्याने स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांची झोपमोड होत असून दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या बांधकाम व्यावसायिकावर कारवाई करावी.
या निवेदनाची प्रत महापालिकेच्या बांधकाम विभागालाही माहितीसाठी आणि पुढील योग्य त्या कायदेशीर कारवाईकरिता देण्यात आली आहे. महापालिकेने कारवाई न केल्यास आंदोलन केले जाईल, असे शिरोळे यांनी स्पष्ट केले आहे.