मोशी | १४ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथील संजय गांधीनगर परिसरात गाडी लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ४७ वर्षीय व्यक्तीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने फिर्यादीच्या छातीत बुक्क्यांनी मारहाण करून डोक्यात दगड मारल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास मोशीतील संजय गांधीनगर परिसरात गणपती मंदिराच्या पाठीमागे घडली.
या प्रकरणी गणेश रावसाहेब लोंढे (वय ४७ वर्षे, रा. वडगाव घेनंद, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून आकाश शशिकांत तावडे (वय ३५ वर्षे, रा. संजय गांधीनगर, मोशी, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आपल्या गाडीजवळ असताना आरोपीने त्यांच्याशी गाडी लावण्याच्या जागेवरून वाद घातला. ‘ही गाडी लावायची जागा आहे का? तुला समजत नाही का?’ असे म्हणत आरोपीने फिर्यादीच्या अंगावर धाव घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर आरोपीने फिर्यादीच्या छातीत बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच रस्त्यावर पडलेला दगड हातात घेऊन फिर्यादीला धमकावल्याचा आरोप आहे.
‘थांब आता तू, माझ्याशी हुज्जत घालतो का? तुला ठार मारतो,’ असे म्हणत आरोपीने हातातील दगड फिर्यादीच्या डोक्यात डाव्या बाजूस मारून त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८३०/२०२६ नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आकाश तावडे याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.