पिंपळे सौदागर लिनिअर गार्डनमधील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी

पिंपळे सौदागर लिनिअर गार्डनमधील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड | १४ ऑक्टोबर २०२६ : पिंपळे सौदागर परिसरातील लिनिअर गार्डन आणि वॉकिंग व सायकलिंग ट्रॅकच्या परिसरातून अवजड बांधकाम वाहनांची वाहतूक सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा दावा करत ही वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अ‍ॅड. उमेश राम खंदारे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य उद्यान अधीक्षकांना याबाबत लेखी निवेदन दिले आहे.

निवेदनानुसार, पिंपळे सौदागर येथील मौजे पिंपळे सौदागर, सर्व्हे क्रमांक १६३/१ व १६३/२ परिसरात एका बांधकाम प्रकल्पासाठी महापालिकेने लिनिअर गार्डनमधून JCB, RMC मिक्सर, ट्रक, डंपर आणि इतर अवजड वाहनांना मार्ग वापरण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे खंदारे यांनी म्हटले आहे.

या गार्डनचा वापर दररोज महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक आणि इतर रहिवासी चालण्यासाठी, सायकलिंगसाठी तसेच व्यायामासाठी करतात. अशा ठिकाणी मोठ्या बांधकाम वाहनांची वर्दळ सुरू राहिल्यास अपघाताचा धोका वाढू शकतो, अशी भीती निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

खंदारे यांनी १ जुलै २०२४ रोजी दिलेल्या परवानगीचा उल्लेख करत संबंधित बांधकामासाठी उद्यानातून अवजड वाहनांना मार्ग उपलब्ध करून देण्याची आवश्यकता काय होती, असा प्रश्न उपस्थित केला आहे. संबंधित बांधकाम प्रकल्पातील काही इमारतींचे काम पूर्ण झाल्याचे आणि काही कामांसाठी परवानग्या दिल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

तसेच, बांधकामासाठी १२ मीटर रुंदीचा रस्ता उपलब्ध असल्याचा उल्लेख करत सार्वजनिक उद्यानाचा वापर वाहनांच्या वाहतुकीसाठी करण्याऐवजी पर्यायी मार्गांचा विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महापालिकेने संबंधित परवानगी कोणत्या नियमांनुसार दिली, याबाबत UDCPR, विकास आराखडा आणि सक्षम प्राधिकरणाच्या आदेशांची पडताळणी करावी. यापूर्वी सार्वजनिक मार्गाचा वापर करून झालेल्या बांधकामांचीही चौकशी करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

अवजड वाहनांमुळे लिनिअर गार्डन, वॉकिंग ट्रॅक किंवा परिसरातील सुविधांचे नुकसान झाले असल्यास संबंधित विकासकाकडून दुरुस्तीचा खर्च वसूल करावा. तसेच, सार्वजनिक उद्यानातून बांधकाम वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

सार्वजनिक जागांचा वापर खासगी बांधकामासाठी होऊ नये आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळावे, अशी भूमिका खंदारे यांनी मांडली आहे. संबंधित परवानगी तात्काळ रद्द करून आवश्यक कार्यवाही न झाल्यास भविष्यात दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी महापालिका प्रशासनावर राहील, असा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला आहे.

या निवेदनाच्या प्रती महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनाही पाठविण्यात आल्या आहेत. आता महापालिका प्रशासन या मागणीवर कोणता निर्णय घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories