'महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त मुख्य परीक्षा - २०२५' पुढे ढकलली, ५ एप्रिल ते २ मे २०२६ या कालावधीत होणार परीक्षा
Mar 06 2026
35
'महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त मुख्य परीक्षा - २०२५' पुढे ढकलली, ५ एप्रिल ते २ मे २०२६ या कालावधीत होणार परीक्षा
पुणे, ता. ६ - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणारी 'महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५' पुढे ढकलली आहे. या परीक्षेच्या पूर्व परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर झाल्याने मुख्य परीक्षेसाठी अवघे ३० दिवस शिल्लक राहिले होते. त्यामुळे उमेदवारांनी मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन आयोगाकडून काल (ता. ६) मुख्य परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. परीक्षा ५ एप्रिल ते २ मे २०२६ या कालावधीत पार पडणार आहे.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा ९ नोव्हेंबर २०२५ रोजी झाली. परंतु, पूर्व परीक्षेच्या निकालास विलंब झाला होता. त्यामुळे २९ मार्च रोजी नियोजित असलेल्या मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना केवळ ३० दिवसच हाती असल्याने विद्यार्थी टेन्शनमध्ये होते. त्यामुळे मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती आणि आयोगाने या मागणीची दखल घेतली.
आयोगाचे उपसचिव (जाहिरात) सं. पां. देशमुख यांनी आता शुद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे की, ''उमेदवारांना परीक्षेत कोणताही व्यत्यय येऊ नये आणि ती सुरळीतपणे पार पडावी, यासाठी सुधारित तारखेस परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता मुख्य परीक्षा ५ एप्रिल ते २ मे २०२६ या कालावधीत पार पडेल.''