बाणेर | १० ऑक्टोबर २०२६ : मुळशी तालुक्यातील सूस येथील एका गृहनिर्माण सोसायटीच्या मालकीची ३५ आर जमीन अनधिकृतपणे विकून तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोसायटीच्या नावाचा गैरवापर करून संबंधित जमीन इतर व्यक्तींना विकल्याचा आरोप असून, या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरेन्द्र कुमार दिनदयाल वर्मा (वय ७०, बाणेर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी रजणीत कुमार जडुनाथ सुर (चेअरमन, रा. कृष्णकमल सोसायटी, सूस रोड, पाषाण), शैलेश रामराव गुरुनुले (सेक्रेटरी, रा. सुकासा सोसायटी, दत्तमंदिर रोड, वाकड), एक महिला आरोपी आणि इतर सहकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.
फिर्यादीनुसार, मुळशी तालुक्यातील सूस येथील गट क्रमांक ९७/२/अ मधील ३५ आर जमीन फिर्यादीच्या डी.आर.डी.ओ. ऑफिसर्स को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या मालकीची आहे.
आरोपींनी आपापसात नियोजनबद्ध कट रचून या जमिनीची अनधिकृतपणे विक्री केल्याचा आरोप आहे. त्यासाठी सोसायटीच्या नावाचा गैरवापर करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
आरोपींनी इसम नामे गुलाब लक्ष्मण चांदरे, मंगेश लक्ष्मण चांदरे, संदीप लक्ष्मण चांदरे आणि अक्षय बाळकृष्ण चांदरे यांना संबंधित जमीन तीन कोटी रुपयांच्या मोबदल्यात विकली, असे तक्रारीत म्हटले आहे.
या व्यवहारातून आरोपींनी स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला. तसेच सोसायटीच्या सदस्यांचे आर्थिक नुकसान करून फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
हा प्रकार ५ मार्च २०२६ रोजी घडल्याचे फिर्यादीत नमूद असून, बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक ५८४/२०२६ नोंदविण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३३६(३), ३४०(२) आणि ६१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बाणेर पोलीस करत आहेत.