तरुणावर कोयत्याने हल्ला; जीवे मारण्याचा प्रयत्न, पाच आरोपींना अटक

तरुणावर कोयत्याने हल्ला; जीवे मारण्याचा प्रयत्न, पाच आरोपींना अटक

पिंपरी | १० ऑक्टोबर २०२६ : नेहरूनगर परिसरात जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका २३ वर्षीय तरुणावर कोयता, सिमेंटचा गट्टू आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (८ ऑक्टोबर) रात्री दहाच्या सुमारास साई फूट वेअरसमोरील पॅसेजमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी संत तुकारामनगर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल शिवाजी लष्करे  (वय २३,  नेहरूनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी रोहित ऊर्फ भुऱ्या सिद्धार्थ कांबळे (वय २०, रा. विठ्ठलनगर), ओंकार ऊर्फ चिक्या दत्ता उकीरडे (वय १८, रा. संतोषी माता चौक, नेहरूनगर), चिराग प्रविण गोरखा (वय १८, रा. डी-६३ पत्राशेड, नेहरूनगर), गणेश राजू हरळ (वय २१, रा. समता हाउसिंग सोसायटी, विठ्ठलनगर) आणि अनिकेत अमोल यादव (वय २०, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांना अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी विशाल लष्करे हे त्यांचा मित्र कौस्तुभ देशमुख याच्यासोबत पान खाण्यासाठी नेहरूनगरमधील साई पान शॉपजवळ गेले होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा रोहित ऊर्फ भुऱ्या कांबळे आणि त्याचे तीन अनोळखी साथीदार तेथे आले.

फिर्यादीनुसार, जुन्या भांडणाचा राग मनात धरून रोहितने विशाल यांना उद्देशून बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना पान शॉपच्या बाजूला असलेल्या साई फूट वेअरसमोरील पॅसेजमध्ये नेण्यात आले.

तेथे रोहितने कंबरेतील कोयता काढून विशाल यांच्या डोक्यावर वार केला. विशाल यांनी उजव्या हाताने वार अडवल्याने त्यांच्या उजव्या हाताच्या बोटांना जखम झाली.

यावेळी विशाल यांचा मित्र कौस्तुभ त्यांना वाचवण्यासाठी पुढे आला. मात्र, आरोपीच्या एका साथीदाराने कौस्तुभच्या उजव्या पायावर सिमेंटचा गट्टू मारून त्यालाही जखमी केले. या गोंधळात विशाल खाली पडले.

त्यानंतर आरोपींच्या साथीदारांनी विशाल यांना हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एका साथीदाराने त्यांच्या छातीवर सिमेंटचा गट्टू मारला. तसेच रोहितने हातातील कोयत्याने विशाल यांच्या डोक्यावर, दोन्ही हातांवर, उजव्या डोळ्याजवळ आणि पाठीवर वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या हल्ल्यात विशाल गंभीर जखमी झाले. आरोपींनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५२४/२०२६ नोंदविण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय हत्यार कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories