राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १५० व्या तुकडीचा २९ व ३० मे रोजी दीक्षान्त समारंभ
पुणे, ता. 28 - खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या (NDA) १५० व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ 29 व 30 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये, प्रशिक्षण पूर्ण करुन देशसेवेसाठी सज्ज झालेल्या महिला छात्रांच्या तिसरया तुकडीचे संचलन पाहायला मिळणार आहे.
या दीक्षान्त समारंभात शुक्रवारी (ता. 29) दुपारी साडेबारा वाजता भारतीय वायुसेनेच्या ‘सारंग हेलिकॉप्टर डिस्प्ले संघा’ची चित्तथरारक व नेत्रदीपक प्रात्यक्षिके सादर होणार आहेत.
भारतीय वायुसेनेचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून ओळखला जाणारा सारंग संघ हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) विकसित केलेले स्वदेशी बनावटीचे ‘ॲडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर’ (एएलएच) ध्रुव (मार्क १) हेलिकॉप्टर वापरते. आत्मनिर्भर भारताचे हे एक उत्तम उदाहरण असून, या हेलिकॉप्टरच्या उड्डाणाला आता साधारण २० वर्षे पूर्ण होत आहेत. २००४ मध्ये सिंगापूरमध्ये झालेल्या एशियन एरोस्पेस शोमधून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करणाऱ्या या टीमने आतापर्यंत जगभरातील ३९० हून अधिक ठिकाणी तब्बल एक हजार २०० पेक्षा जास्त प्रात्यक्षिके यशस्वीपणे पूर्ण केली आहेत.
शनिवारी (ता. 30) एनडीएमधील खेतरपाल परेड ग्राउंडवर Passing Out Parade होणार आहे.