शहरातील कायदा-सुव्यवस्था अन् इतर प्रश्नांवर पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाची पोलिस प्रशासनाशी चर्चा
शहरातील कायदा-सुव्यवस्था अन् इतर प्रश्नांवर पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाची पोलिस प्रशासनाशी चर्चा
पिंपरी, ता. २८ - शहरातील कायदा-सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षा आणि वाढती वाहतूक कोंडी या गंभीर प्रश्नांवर पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघ (PCCHSF) आणि पोलीस प्रशासन यांच्यात नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महासंघाचे अध्यक्ष सचिन लोंढे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त विनय चोबे यांची भेट घेऊन विविध नागरी समस्यांवर सविस्तर चर्चा केली.
या बैठकीस महासंघाचे सचिव सचिन गुणाले, कोषाध्यक्ष प्रदीप घोरपडे, संचालक अरुण देशमुख, रोहित सावंत व वैभव चौधरी उपस्थित होते. पोलीस प्रशासनाच्या वतीने अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड आणि बसवराज तेली यांनी सहभाग घेतला.
यावेळी शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत बसवण्यात आलेल्या CCTV नेटवर्कबाबत झालेल्या चर्चेत शहरातील सुमारे ३,३०० कॅमेऱ्यांपैकी जवळपास २,५०० कॅमेरे निगडी येथील एकात्मिक नियंत्रण व कमांड सेंटरला (ICCC) जोडलेले नसल्याचे निदर्शनास आणण्यात आले. अनेक कॅमेरे वीजबिल न भरल्यामुळे बंद असल्याने दाट लोकवस्तीच्या भागात नागरिकांची, विशेषतः महिला व ज्येष्ठांची सुरक्षा धोक्यात आली आहे. यावर पोलीस आयुक्तांनी तातडीने कंत्राटदार व तांत्रिक यंत्रणांशी समन्वय साधून सर्व कॅमेरे कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत.
ॲप-आधारित रिक्षा व कॅब चालकांकडून अतिरिक्त भाडे मागणे, प्रवास अर्ध्यावर सोडणे, मीटरप्रमाणे पैसे देण्याची सक्ती यासारख्या तक्रारींवरही चर्चा झाली. यावर पोलीस आयुक्तांनी रिक्षा संघटना, RTO, वाहतूक पोलीस आणि संबंधित कंपन्यांची संयुक्त बैठक तातडीने आयोजित करण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांसाठी ‘प्रवासी सन्मान आचारसंहिता’लागू करण्याबाबतही चर्चा झाली.
शहरातील सिग्नल चौकांवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सिग्नलपासून ५० ते १०० मीटर परिसरात ‘नो-पार्किंग झोन’ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर तातडीने राबवण्याचे आदेश वाहतूक विभागाला देण्यात आले. तसेच हिंजवडी आयटी पार्कमधील अपूर्ण रस्ते व वाहतूक सुधारणा कामांमुळे होणाऱ्या दैनंदिन कोंडीबाबत महासंघाने लक्ष वेधले. यावर पोलीस आयुक्तांनी वाहतूक शाखेला आयटी पार्क प्रशासनाशी समन्वय साधून प्रलंबित उपाययोजनांचा आढावा घेण्याचे आदेश दिले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरु असलेल्या विशेष पोलिस ॲपबाबत महासंघाने समाधान व्यक्त करण्यात आले. या ॲपची माहिती सोसायट्यांमध्ये जाऊन देण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्याचे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले.
पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे अध्यक्ष सचिन लोंढे म्हणाले, “पिंपरी चिंचवडच्या नागरिकांची सुरक्षा व वाहतूक सुलभता हे आमचे प्राधान्य आहे. झालेल्या बैठकीत पोलीस आयुक्तांनी घेतलेले निर्णय स्वागतार्ह असून महासंघ प्रशासनाकडे सातत्याने याबाबत पाठपुरावा करेल. पिंपरी-चिंचवड सुरक्षित व शिस्तबद्ध शहर बनवण्यासाठी आम्ही जबाबदारीने काम करत राहू. ”