पिंपरी | १५ ऑक्टोबर २०२६ : भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत आयोजित कार्यक्रमात डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच उपायुक्त आण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अब्दुल कलाम यांनी विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि राष्ट्रनिर्मिती या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिले. देशाच्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये त्यांनी बजावलेली भूमिका आणि तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी दिलेली प्रेरणा यांचे यावेळी स्मरण करण्यात आले.
शास्त्रज्ञ म्हणून देशाच्या संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीसाठी कार्य करतानाच राष्ट्रपती म्हणूनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. विशेषतः विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे आणि देशाच्या विकासात तरुणांनी सक्रिय सहभाग घ्यावा, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
डॉ. कलाम यांचे विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि राष्ट्रनिर्मितीचा संदेश आजही तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याची भावना या अभिवादन कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आली.