पुणे | १५ ऑक्टोबर २०२६ : मुलांच्या हातात ‘विंग्ज ऑफ फायर’ हे पुस्तक द्या आणि त्यांना मोठी स्वप्ने पाहायला सांगा. हीच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन पीएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी केले.
भारताचे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील मुख्यालयात गुरुवारी (दि. १५) अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या की, डॉ. कलाम यांनी राष्ट्रासाठी समर्पित भावनेने काम करण्याचा आदर्श निर्माण केला. रामेश्वरममधील सामान्य कुटुंबातून सुरू झालेला त्यांचा प्रवास इस्रो, डीआरडीओ आणि राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचला. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. त्यांचा जीवनप्रवास विद्यार्थ्यांना जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाचे महत्त्व शिकवतो.
याप्रसंगी मंजुलक्ष्मी यांनी कोल्हापूर महानगरपालिकेत आयुक्त म्हणून कार्यरत असताना राबविलेल्या एका विशेष उपक्रमाची आठवण सांगितली. या उपक्रमांतर्गत शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या २५ विद्यार्थ्यांना विमानाने इस्रोच्या अभ्यास सहलीवर नेण्यात आले होते.
गुणवंत विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संस्थेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला होता. डॉ. कलाम यांच्या विचारांतूनच या उपक्रमाची प्रेरणा मिळाल्याचे मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला सहआयुक्त रूपाली आवले-डंबे, अधीक्षक अभियंता अनिल सगर, उपायुक्त राजेश माशेरे, अधीक्षिका आशा जाधव, कार्यकारी अभियंता शिवकुमार कुपल, उपअभियंता डी. एम. चौरे आणि माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे यांच्यासह पीएमआरडीएचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.