क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - ११ ऑगस्ट २०२६
-----------------------------------------------------------------------------------------------------
🔴 थेरगावात कारची तोडफोड करून चालकाकडून दीड हजार रुपये लुटले
थेरगाव येथे कारची काच फोडून नुकसान केल्यानंतर चालकाच्या गळ्याला कोयता लावून त्याच्याकडील दीड हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याची घटना सोमवारी (१० ऑगस्ट) पहाटे तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात दोन भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव आनंदराव नळगिरे (वय २७, रा. वनदेवनगर, थेरगाव) यांनी त्यांची कार आनंद हॉस्पिटलजवळ पार्क केली होती. त्यावेळी आरोपी नीरज हकीम सोळंकी (वय २१) आणि सूरज हकीम सोळंकी (वय १९, दोघे रा. क्रांतीनगर, थेरगाव) यांनी कारच्या उजव्या बाजूच्या मागील दरवाजाची काच तसेच मागील काच पेव्हर ब्लॉक, विटा आणि कोयत्याने फोडून नुकसान केले.
नळगिरे यांनी आरोपींना अडविण्याचा प्रयत्न केला असता नीरज याने त्यांच्या गळ्याला कोयता लावला. त्याचवेळी सूरज याने नळगिरे यांच्या खिशातून ५०० रुपयांच्या तीन नोटा, असे एकूण दीड हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९, ३२४(५) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक झिजुके तपास करीत आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------
🔴 अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा
अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर संशय घेत मानसिक व शारीरिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका २१ वर्षीय तरुणाविरुद्ध देहूरोड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ जुलै रोजी रात्री चिंचोली परिसरात घडली. आरोपीविरोधात सोमवारी (ता. १०) देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित १७ वर्षीय मुलगी तिच्या आजी-आजोबांकडे राहत होती. आरोपी साहिल हनुमंत दणाणे (वय २१, रा. लक्ष्मीनगर, झेंडेमळा, देहूगाव) हा तिच्याशी फोनवरून संपर्क साधत होता. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर तिच्यावर संशय घेऊन तिला कथितरीत्या शारीरिक व मानसिक त्रास दिला. या त्रासामुळे तणावात आलेल्या मुलीने घरातील साडीच्या सहाय्याने स्वयंपाकघरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------
🔴‘डेट चेंज’च्या नावाखाली ज्येष्ठाची ६.७० लाखांची ऑनलाइन फसवणूक
‘डेट चेंज’ करण्यासाठी एपीके फाइल डाउनलोड करण्यास सांगून एका ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाइन पद्धतीने तब्बल ६ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीसह संबंधित बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनवर शफीक सय्यद (वय ६१, रा. पिंपळे गुरव) यांच्या राहत्या घरी ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते रात्री साडेनऊ या कालावधीत हा प्रकार घडला. एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून आरोपीने फिर्यादीशी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ‘EMISÉO डेट चेंज’ करण्यासाठी एपीके फाइल डाउनलोड करण्यास सांगितले.
फिर्यादी यांनी आरोपीच्या सांगण्यावरून प्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या खात्यातून ६ लाख ७० हजार रुपये परस्पर काढून घेण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा मोबाइल क्रमांक तसेच रक्कम स्वीकारणाऱ्या बँक खात्याच्या धारकाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------
🔴 वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलांविरोधात गुन्हा दाखल
➡️ किवळेत सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव केल्याप्रकरणी तरुणीवर गुन्हाकिवळे परिसरातील जुना बंगळूर-मुंबई महामार्गावरील लेजसी वुड्स इमारतीसमोरील सर्व्हिस रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून नागरिकांना अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरून २३ वर्षीय तरुणीविरुद्ध देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १० ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास घडली. संबंधित तरुणीने वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना शब्दांनी व डोळ्यांनी खुणावून तसेच हाताने लैंगिक हावभाव केल्याचा आरोप आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण होऊन सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलिस हवालदार संतोष म्हस्के यांनी फिर्याद दिली. त्यावरून अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम, १९५६ मधील कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--
➡️ मॅगझीन चौकात अश्लील हावभाव केल्याच्या आरोपावरून महिलेवर गुन्हा
मॅग्झीन चौक परिसरात अश्लील हावभाव व शब्दांचा वापर करून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास दिल्याच्या आरोपावरून ४४ वर्षीय महिलेविरुद्ध दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १० ऑगस्ट रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास भोसरीकडून मॅग्झीन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला घडली. संबंधित महिलेने फिर्यादी व इतर नागरिकांकडे अश्लील हावभाव करून अश्लील शब्द उच्चारले. तसेच त्यांच्या अंगावरून हात फिरविल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडथळा व त्रास निर्माण होऊन सार्वजनिक सभ्यतेचा भंग झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार शरद विंचू यांनी फिर्याद दिली. त्यावरून अनैतिक व्यापार प्रतिबंधक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ मधील कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--
➡️ मॅगझीन चौकात अश्लील हावभाव केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा
सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव व अश्लील शब्दांचा वापर करून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनल रवी देशमुख (वय ३७, रा. आदर्शनगर, पुणे-नाशिक रस्ता, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (१० ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास दिघी-आळंदी रस्त्यावरील मॅगझीन चौक परिसरात ही घटना घडली. संबंधित महिलेने फिर्यादी व इतर व्यक्तींकडे अश्लील हावभाव करून अश्लील शब्द उच्चारले. तसेच त्यांच्या अंगावरून हात फिरविल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होऊन सार्वजनिक सभ्यतेचा भंग होईल, अशी कृती केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी पोलिस शिपाई मारुती आपय्या घुगरे (वय ५०, दिघी पोलिस ठाणे) यांनी फिर्याद दिली. दिघी पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ मधील कलम ८ अन्वये सोमवारी रात्री ११.३८ वाजता गुन्हा दाखल केला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------
🔴 जमिनीच्या वादातून ७८ वर्षीय महिलेवर दांडक्याने हल्ला
भोसे (ता. खेड) येथे जमिनीच्या ताब्यावरून झालेल्या वादातून ७८ वर्षीय महिलेच्या उजव्या खांद्यावर लाकडी दांडक्याने मारून तिला जखमी केल्याची घटना सोमवारी (ता. १०) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलाबाई नामदेव बोऱ्हाडे (वय ७८, रा. वडगाव मावळ, ता. खेड) यांच्या तक्रारीवरून सखाराम विठ्ठल लोणारी, नंदकुमार सखाराम लोणारी, चंद्रशेखर सखाराम लोणारी आणि शैला सखाराम लोणारी (सर्व रा. भोसे, ता. खेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोऱ्हाडे यांची मुलगी व नातू हे भोसे येथील जमीन गट क्रमांक ८२२ येथे कंपाउंड करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. ‘जमीन आमची आहे, तुम्ही कसा ताबा घेता,’ असे म्हणत त्यांनी वाद घातला. या वादातून आरोपी सखाराम लोणारी याने तेथे पडलेले लाकडी दांडके हातात घेऊन बोऱ्हाडे यांच्या उजव्या खांद्यावर मारून त्यांना जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तसेच एका आरोपीने बोऱ्हाडे यांना हाताने मारहाण केली. इतर आरोपींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच बोऱ्हाडे यांच्या मुलगी व नातूलाही हाताने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५१(२), ११५(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
-----------------------------------------------------------------------------------------------------
🔴 कस्पटे चौकात अज्ञात कारची धडक, पादचाऱ्याचा पाय फ्रॅक्चर
बालेवाडीहून पिंपळे सौदागरकडे पायी जात असलेल्या व्यक्तीला भरधाव अज्ञात कारने धडक दिल्याची घटना कस्पटे चौक येथे ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या अपघातात संबंधित व्यक्तीच्या उजव्या पायाला गुडघ्याखाली फ्रॅक्चर झाले. अपघातानंतर कारचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. कारचालकाविरोधात १० ऑगस्टला वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत देवप्पा दुर्गप्पा म्हेत्रे (वय २३, रा. पिंपळे सौदागर, मूळ रा. सैदापूर, ता. यादगीर, जि. यादगीर) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पांढऱ्या रंगाच्या अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील बालेवाडी ते पिंपळे सौदागर असा कस्पटे चौक मार्गे पायी जात होते. त्यावेळी पांढऱ्या रंगाची अज्ञात कारचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने वाहन चालवत त्यांना धडक दिली. यात त्यांच्या उजव्या पायाला गुडघ्याखाली गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले. अपघातानंतर चालकाने कार न थांबविता तेथून पलायन केले.
या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात १० ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात कारचालकाचा शोध घेण्यात येत आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------
🔴 कुदळवाडीतून २० हजारांची दुचाकी चोरी
कुदळवाडी परिसरातील अपना वजन काट्याजवळ रस्त्याच्या कडेला लॉक करून पार्क केलेली हिरो स्प्लेंडर दुचाकी अज्ञात चोरट्याने ९ ऑगस्टला चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कासीम अली नुसरत अली रहमानी (वय ३३, रा. बालघरेनगर, कुदळवाडी, चिखली) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते सायंकाळी पाचच्या दरम्यान रहमानी यांनी त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर दुचाकी (एमएच १४ केएच १७२९) अपना वजन काट्याजवळ रस्त्याच्या कडेला लॉक करून पार्क केली होती. काही वेळाने तेथे परतल्यानंतर दुचाकी आढळून आली नाही.
अज्ञात चोरट्याने सुमारे २० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चिखली पोलिस ठाण्यात १० ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------
🔴 बावधनमध्ये दोन किलो गांजा जप्त, एकाला अटक
बावधन परिसरात विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला सुमारे १ लाख रुपये किमतीचा १ किलो ९९२ ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी रुपेश गोपाळ शेट्टी (वय ३८, व्यवसाय-हॉटेल चालक, रा. शेडगेवाडा, भुगाव, ता. मुळशी) याला अटक करण्यात आली आहे. कृष्णा साखरे (रा. भुंडेवस्ती, बावधन, पुणे) याचाही आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑगस्ट ही कारवाई पद्मावती हॉटेल (भूगाव - ता. मुळशी) येथे करण्यात आली. शेट्टी याच्या ताब्यात विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या गांजा असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून १,९९२ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. हा गांजा कृष्णा साखरे याने विक्रीसाठी शेट्टी याला दिल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------
🔴 कोयता बाळगल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत घातक शस्त्र बाळगण्यास मनाई आदेश लागू असतानाही लोखंडी कोयता बाळगल्याप्रकरणी एका २२ वर्षीय तरुणावर आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज हनुमंत कांबळे (वय २२, सध्या रा. ठाकूरवस्ती, सोळू, ता. खेड) असे आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट-३ मधील पोलिस शिपाई दलीप विठ्ठलराव राठोड यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास क्याहोली खुर्द येथील प्लुमेरिया मंगल कार्यालयाजवळ कांबळे हा लोखंडी कोयता बाळगताना आढळून आला. त्याच्याकडील कोयत्याची किंमत सुमारे ५०० रुपये आहे.
पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त यांनी ५ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीपासून १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीपर्यंत आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई करणारा आदेश जारी केला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप कांबळे याच्यावर आहे. आळंदी पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम ४ (२५) तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------
🔴 चाकणमध्ये कोयता बाळगणाऱ्या तरुणावर गुन्हा
चाकण परिसरात बेकायदेशीररीत्या लोखंडी कोयता बाळगल्याप्रकरणी १९ वर्षीय युवकाविरुद्ध उत्तर चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा सुनील भंडलकर (वय १९, रा. भुजबळ आळी, चाकण, ता. खेड) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत, पोलिस शिपाई समीत गौतम जगझाप यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. १०) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास चाकण गावच्या हद्दीत चक्रेश्वर रोड ते कडाचीवाडी जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला, विघ्नेश पार्कसमोर मोमीन काझी यांच्या मालकीच्या मोकळ्या प्लॉटजवळ आरोपी भंडलकर हा कोयता बाळगताना आढळून आला. त्याच्याकडून सुमारे ५०० रुपये किमतीचा काळ्या व हिरव्या रंगाच्या प्लास्टिक मुठीचा लोखंडी कोयता जप्त करण्यात आला. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई असतानाही आरोपीने कोयता बाळगला. या प्रकरणी उत्तर चाकण पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------